चोरून आणलेली फुलं देवाला नको; साताऱ्यात बोर्डची चर्चा
By प्रगती पाटील | Published: December 31, 2023 06:28 PM2023-12-31T18:28:03+5:302023-12-31T18:30:24+5:30
नववर्षाचा संकल्प बोर्डाद्वारे व्यक्त.
सातारा : भल्या सकाळी व्यायामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या सातारकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील काही जण चक्क फळाफुलांची चोरी करतात. यावर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेला बोर्ड सध्या चर्चेत आहे. 'चोरून आणलेली फुले देवाला वाहणार नाही. झाडे लावणाऱ्यांसाठी ती ठेवूया,' असा मजकूर लिहिलेला बोर्ड समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सकाळी फिरण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या लोकांच्या हातात आणि खिशात प्लास्टिकच्या पिशव्या असतात. व्यायाम करून झाला की परतीच्या मार्गाने जाताना या पिशव्या खिशातून बाहेर निघतात. लोकांच्या दारात लावलेल्या झाडांच्या फुलांवर मग डल्ला मारला जातो. रोज सकाळी न चुकता घरच्या देवांसाठी म्हणून ही फुलं तोडली जातात. याविषयी कोणी हटकले तर असू दे की देवासाठी तर नेतोय असे उत्तर दिले जाते. विशेष म्हणजे फुलं तोडण्यापासून कोणाला हटकले तर भल्या सकाळी भांड नाही होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते काहीजण तर कंपाऊंडच्या बाहेर झाड आहे म्हणून फुल तोडली असे समर्थनही करतात.
१. स्वकष्टाने अशी करा भक्ती
गेल्या काही वर्षात साताऱ्यात अपार्टमेंट संस्कृती रुजली आहे. त्यामुळे लोकांना झाडे लावण्यासाठी अंगण किंवा पुरेशी जागा उपलब्ध नसते ही वस्तुस्थिती असली तरी, दोन कुंड्यांमध्ये फुल झाडे लावून त्याची फुलं देवाला अर्पण करणे सहज शक्य आहे. तितकी जागा प्रत्येकाकडेच असते. स्वकष्टाने भक्ती करण्याचा हा मार्ग नववर्षाच्या निमित्ताने सातारकरांनी अवलंब व्हावा अशी अपेक्षा आहे.
झाड रोप आणण्यापासून त्याला खत पाणी घालून मोठी करे पर्यंत सर्व जबाबदारी आम्ही पार पाडायची आणि भल्या सकाळी फिरण्याच्या निमित्ताने येणारी ही भामटी मंडळी फुलं चोरून नेणार हे चूक आहे. देवाला ताजी फुलं पाहिजे असतील तर चार कुंड्या घेऊन त्यात फुलझाडे लावावीत. देवाच्या नावाने चोरीचे उद्योग संबंधीतानी बंद करावेत.
- चंद्रशेखर गाडगीळ, गुरुवार पेठ