रातोरात झाला दगडाचा ‘देव’
By admin | Published: February 1, 2015 10:35 PM2015-02-01T22:35:35+5:302015-02-02T00:04:28+5:30
अतिक्रमणाला श्रद्धेचा अडसर : अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वाटेत अनेक ठिकाणी ‘म्हसोबा’
सातारा : रस्त्यावरून जात असताना एखादे मंदिर दिसल्यास माणसाची पावले आपोआप त्या दिशेने वळतात. कितीही घाई गडबड असली तरी चालता-चालता हात जोेडून नमस्कार करणारी माणसे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. देव म्हटलं की, श्रद्धा आणि अस्थेचा प्रश्न असतो. त्यामुळे काहीजण देवाच्या नावाखालीही अनेक क्लृप्त्या करतात. त्यापैकीच एक म्हणजे अतिक्रमण मोहिमेला जरब बसावी म्हणून साताऱ्यातील मुख्यबाजार पेठेजवळील राजवाडा येथे रातोरात एका दगडाचा ‘देव’ झाला आहे. शिखरासारखा निमुळत्या असलेल्या दगडावर लिंबू, कुंकू आणि हार घालून त्याचे पूजन केले जात आहे. या अगळ्यावेगळ्या देवाने मात्र अतिक्रमण मोहिमेलाही खो घातला की काय, असे वाटू लागले आहे. सातारा पालिकेने महिनाभरापूर्वी शहरामध्ये अतिक्रमण मोहीम राबविली. त्यावेळी त्या मोहिमेतील अधिकाऱ्यांना अनेक समस्या आल्या. कोणी कोर्टात धाव घेतली, कोणी जागेची कागदपत्रे दाखविली तर कोणी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. मात्र, तरीही रडतखडत ही मोहीम आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत पार पडली; परंतु पुन्हा ही अतिक्रमण मोहीम सुरू होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सगळे उपाय करून थकलेल्या काहीजणांनी अतिक्रमण मोहिमेला थोपविण्यासाठी चक्क हटके फंडा शोधून काढलाय.
तुळजाभवनी कॉम्प्लेक्सजवळ एक जुनी इमारत आहे. या इमारतीसमोर भिंतीलगत छोटासा निमुळता दगड आहे. दोन दिवसांपूर्वी रातोरात या दगडाचा चक्क देव झाल्याचे सकाळी लोकांना पाहायला मिळाले. तेथून जाणारे लोकही त्या दगडाकडे कुतूहलाने पाहू लागले. हार, कुंकू, लिंबू त्या दगडावर वाहिला आहे. या ‘देवाची’ इतकी दहशत बसलीय की, पाईपलाईनचे काम करणारे कर्मचारीही चांगलेच धास्तावलेत. यादोगोपाळ पेठेतून सध्या पाईपलाईनसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. राजवाड्यापासून खोदकाम करत सर्व कर्मचारी त्या दगडाजवळ आले. हळदी-कुंकू पाहून ते थोडावेळ थबकले. त्या दगडाला कसलाही धक्का न लावता त्यांनी खोदकाम केले. त्या ठिकाणी त्यांनी चप्पल घालून काम केले नाही. काही अंतरावर खोदकाम गेल्यावर त्यांनी चपला घातल्या. रस्त्यामध्ये चर काढणाऱ्या कामगारांनीही या ‘देवा’ची भीती घेतली. आता अतिक्रमण मोहिमेचे कर्मचारी या देवाचे काय करणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. रातोरात उगम झालेल्या या देवाची भलतीच चर्चा सध्या शहरात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
प्रशासनाचा कानाडोळा
शहरात ठिकठिकाणी हिच संकल्पना राबवून अनेकांनी भावनेच्या जोरावर अतिक्रमणे पचविली आहेत. अशा ठिकाणी जेसीबी सुद्धा पुढे येण्यास कचरतो. अनधिकृत झोपडपट्यांमध्येही मंदिरे बांधण्यात आली आहेत. विशेष म्हणजे संबंधित यंत्रणेकडून अशा मंदिरांच्या उभारणीच्यावेळी कानाडोळा करण्यात आला आहे.