गोडोलीत उद्रेक;आता आमची सटकली!
By admin | Published: August 29, 2014 09:03 PM2014-08-29T21:03:20+5:302014-08-29T23:08:30+5:30
रस्त्यावर पुन्हा पाणी : संतप्त नागरिकांनी चेंबर फोडून ओढा केला मोकळा
सातारा : डोंगरउतारावरील पाण्याचे नैसर्गिक मार्ग अडविले गेल्यामुळे गोडोली परिसरात सातत्याने पाणी साचून नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त गोडोलीकरांनी ओढ्यावर बांधलेले चेंबर आणि सिमेंटची वाहिनी शुक्रवारी फोडली. विघ्नहर्त्याच्या आगमनादिवशीच पाणी साचून राहिल्याने गोडोलीत पुन्हा भीतीची आणि त्यापाठोपाठ संतापाची लाट उसळली.
वीस आॅगस्ट रोजी साताऱ्यात पाऊण तासात ८२ मिलीमीटर पाऊस झाला. अजिंक्यतारा किल्ल्यावरून वाहत येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांचे प्रवाह जागोजागी अडविल्याने आणि वळविल्याने गोडोलीत तुडुंब पाणी साचले होते. चिखलमिश्रित पाण्याने लाखोंचे नुकसान झाले होते. त्यानंतर नैसर्गिक प्रवाह अडविण्याचा आणि वळविण्याचा विषय ऐरणीवर आला होता. वीस तारखेच्या हाहाकारानंतर दररोज दुपारी अंधारून येत होते आणि जोरदार पाऊस पडत होता. प्रत्येक वेळी गोडोलीकरांच्या छातीत धस्स होत होते. ओढ्यांवरील अतिक्रमणे काढावीत आणि नैसर्गिक प्रवाह वळविण्याचा खटाटोप थांबवावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. गोडोलीकरांनी सातारा-कऱ्हाड मार्गावर रास्ता रोको आंदोलनही केले होते. दरम्यान, काही मंडळी यात राजकारण आणत असल्याचा आरोप करून पत्रकबाजी सुरू झाली आणि या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. ओढा सिमेंटच्या पाइपमध्ये बंदिस्त करून दोन चेंबर बांधण्यात आल्याने त्याचे पाणी साचून परिसरात पसरत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. ही त्रुटी सुधारण्यासाठी पावले टाकली जातील, अशी आश्वासने दिली गेली. तसेच ओढ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणीही केली होती. तथापि, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नाही आणि पाऊस मात्र कोसळत राहिला. शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या दिवशीच परिसरात पाणी साचू लागल्याने नागरिकांची ‘सटकली’ आणि त्यांनी पहारी हाती घेतल्या. ओढ्याचा प्रवाह बंदिस्त वाहिनीतून एका चेंबरमध्ये सोडण्यात आला आहे, ते चेंबरच फोडण्यास नागरिकांनी सुरुवात केली. त्याला जोडलेली वाहिनीही फोडण्यास नागरिकांनी प्रारंभ केला. ओढ्याच्या पाण्याला नैसर्गिक वाट मोकळी करून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, असे नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)