सुटीत बाहेरगावी जाताय; स्टेटस ठेवू नका!, नाहीतर..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 03:18 PM2024-04-08T15:18:34+5:302024-04-08T15:19:53+5:30

पोलिसांकडून आवाहन

Going out on vacation; Don keep status, otherwise There will be theft at home | सुटीत बाहेरगावी जाताय; स्टेटस ठेवू नका!, नाहीतर..

सुटीत बाहेरगावी जाताय; स्टेटस ठेवू नका!, नाहीतर..

सातारा : हल्ली घरात काहीही झालं की, स्टेटसवर ठेवण्याची अनेकांना भारी हाैस असते. ही हाैस कधी सवय बनून जाते, हेही त्यांनाही समजत नाही. मात्र, अलीकडे एक नवं फॅड आलंय. सुटीसाठी कुटुंब बाहेरगावी कुठे गेलेय. किती दिवस तेथे राहणार आहे, याची सारी माहिती व फोटो स्टेटसवर ठेवले जातात; पण हाच स्टेटस पाहून इकडे त्यांचे घर साफ होते. असे अनेकदा घडले असून, सुटीत बाहेरगावी जाताना, स्टेटस ठेवू नका, असे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

शाळांना येत्या काही दिवसांत सुट्या लागणार आहेत. त्यामुळे अनेकजण गावी अथवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु कुटुंबासह बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बंद घरे चोरट्यांच्या ‘रडार’वर असतात. यामुळे घरफोडी, चोरी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते. परंतु सर्व काही पोलिसांवर सोडून अनेक कुटुंबे निर्धास्त बाहेर फिरायला जातात. जातानाही शांततेत न जाता सोशल मीडियावर बोभाटा करत अशी कुटुंबे जातायत. यामुळे चोरट्यांना आयते कोलीत हाती सापडत आहे. 

काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात असाच एक किस्सा घडला. एक गर्भश्रीमंत कुटुंब काश्मीरला पंधरा दिवसांसाठी फिरायला गेले होते. त्या कुटुंबाने स्टेटसवर फोटो अपलोड करून साऱ्या जगाला आपण कुठे फिरतो आहोत, ते सांगितले. त्याचा परिणाम असा झाला. त्यांच्या नात्यातील एका मुलाने त्या कुटुंबाने ठेवलेला स्टेटस पाहिला. त्याचेवळी त्याच्या डोक्यात त्यांच्या घरात चोरी करण्याचा विचार घोळू लागला. त्याने आपल्या मित्रांना सोबत घेऊन जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या नातेवाइकांच्या घरात चोरी केली. १२ तोळे सोने आणि तीन लाखांची रोकड त्याने चोरून नेली. जेव्हा ते कुटुंब परत आले. तेव्हा घरातील ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत चोरीचा छडा लावला. तेव्हा त्या कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. रक्तातील नातेवाइकानेच आपल्या घरात चोरी केल्याने ते कुटुंब अस्वस्थ होते. परंतु यामुळे आपली इज्जत जाईल, या धास्तीने त्या कुटुंबाने त्याच्याविरोधात तक्रार देणे टाळले. त्या कुटुंबाला सोशल मीडियावर स्टेटस ठेवणं चांगलंच भोवलं. अशा प्रकारच्या घटना सध्या अनेक ठिकाणी घडत आहेत. त्यामुळे गाजावाजा न करता आपल्या कुटुंबासह फिरण्याचा आनंद घ्या. जगाला दाखविण्यासाठी नव्हे, असं सांगण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

शेजाऱ्यांशी वादामुळे ‘ते’ राहतात तटस्थ..

शेजारीच हा खरा पहारेकरी, असं पोलिसांकडून नेहमीच म्हटलं जातं. मात्र, शेजारीच आता एकमेकांचे दुश्मन बनत असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या कारणांतून शेजाऱ्यांचे एकमेकांशी मतभेद असतात. यातून त्यांचे बाेलणे भाषण नसते. यामुळे एकमेकांच्या घरात काहीही झालं तरी डोळेझाक केली जाते. त्यामुळे एखाद्याच्या घरात चोरी होत असल्याचे शेजाऱ्याला दिसले तरी तो दुर्लक्ष करून आम्ही काहीही पाहिले नाही, अशा आविर्भावात राहतो. या प्रवृत्तीमुळे पोलिसांना घरफोडीचे गुन्हे उघकीस आणताना नाकेनऊ येत आहे.

Web Title: Going out on vacation; Don keep status, otherwise There will be theft at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.