शेतकरी संपाच्या संधीचं ‘राष्ट्रवादी’कडून सोनं
By admin | Published: June 6, 2017 09:45 PM2017-06-06T21:45:51+5:302017-06-06T21:46:07+5:30
कारण-राजकारण : जिल्ह्यात काँग्रेस अन् शिवसेनेची भूमिका बुचकळ्यात पाडणारी; मात्र आंदोलनात सहभागी असल्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शेती उत्पादनाला हमीभाव, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारुन शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी रान उठरलेले असताना शिवसेना व काँगे्रस या दोन आंदोलनाची पार्श्वभूमी असणाऱ्या पक्षांनी केवळ सहभाग नोंदवला, तर राष्ट्रवादीनं या संधीचं सोनं केलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आक्रमकपणे सामील झाले, पण शिवसेना व काँगे्रसने काही ठिकाणी केवळ सहभाग नोंदवण्याचेच काम केले. मात्र, या दोन्ही पक्षांची भूमिका लोकांना बूचकुळ्यात पाडणारीच ठरली आहे.
अन्यायाविरोधात पेटून उठून आंदोलन करणे, हा तर शिवसेना या संघर्षातून तयार झालेल्या पक्षाचा आत्मा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पेटून उठणारा शिवसैनिक शेतकऱ्यांच्या जीवन मरणाच्या आंदोलनात कुठेही तडफेने सहभागी झालेला दिसत नाही. हे अपयश पदाधिकाऱ्यांचे की वरीष्ठ नेत्यांचे? याबाबत जनसामान्यांत चर्चा सुरु आहे. ‘अन्याय दिसेल तिथे लाथ घाला...पेटून उठा...!’, असे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख द्यायचे आणि शिवसैनिक परिणामांची तमा न बाळगता आंदोलनात सहभागी होत होता. या आदेशानेच शिवसेनेने १९९५ मध्ये स्वबळावर सत्ता आणली. शेतकऱ्यांनीच विश्वास टाकल्याने शिवसेना या सरकारमध्ये सहभागी आहे. पूर्वी अन्यायाविरोधात आंदोलन होत होते. तेव्हा शिवसैनिकांच्या संख्येपेक्षा पोलिसांची संख्या मोठी असायची. शिवसेनेविषयी सर्वसामान्यांच्या मनात आदर व प्रेम अजूनही आहे. मात्र नेत्यांना त्याची किंमत नाही, अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. शेतकरी आंदोलन पेटले असताना शिवसेनेचे दोन्ही जिल्हाध्यक्ष एक पुण्यात तर एक ठाण्यात ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना बळ देण्याची वेळ असताना ही नेते मंडळी कुठे गायब आहेत?, असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सुवर्णकाळ उपभोगलेल्या काँगे्रसही सध्या कोमात गेल्याचेच चित्र आहे. या पक्षातील नेत्यांची तोंड एकमेकांच्या नेमकी विरुध्द दिशेला झाली असल्याने काँगे्रसमध्येही दुफळी पहायला मिळते आहे. संघर्ष यात्रेत, तसेच नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या संपात काँगे्रस नेत्यांनी राष्ट्रवादीसोबत काही ठिकाणी सहभाग नोंदवला. तोही नगण्यच दिसला. काँगे्रसची बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे, त्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरेल.
म्हणे शेतकरी आंदोलनात सक्रीय
काँगे्रस पक्षाचा आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे. शेतकरी देशोधडीला लागला असतानाही गेंड्याची कातडीच्या सरकारला पान्हा फुटेना. महाराष्ट्रात आम्ही संघर्ष यात्रा काढली. ही संघर्ष यात्रा उर्वरित महाराष्ट्रात देखील काढली जावी, यासाठी आम्ही आग्रही आहोत. बुधवारी मुंबईत पक्षाची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
- आमदार आनंदराव पाटील,
जिल्हाध्यक्ष काँगे्रस
शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन सुरु असल्याने त्याला राजकीय रंग चढू नये, यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. कऱ्हाडात सोमवारी काढलेल्या मोर्चात आम्ही सहभागी झालो. शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार ‘मी कर्जमुक्त होणारच’ हे अभियान शिवसेनेने सुरु केले आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एका फॉर्ममध्ये शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व त्यांच्या अपेक्षा भरुन घेतल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी राहिल.
- नितीन बानुगडे-पाटील,
उपनेते शिवसेना
महामार्गावर चारशे पोलिसांचा ‘वॉच’ !सातारा : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे दूध आणि भाज्यांची आवक ठप्प होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस दलाच्या वतीने महामार्गावर तब्बल चारशे पोलिसांचा वॉच अद्याप कायम आहे.
महामार्गावर वाहनांची तोडफोड होऊ नये म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. शिरवळ, खंडाळा, भुर्इंज, सातारा, बोरगाव, कऱ्हाड, तळबीड ही पोलिस ठाणे महामार्गालगत आहेत. या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आपपल्या हद्दीतीतील महामार्गावर बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर या पोलिसांच्या मदतीला जादा कुमकही देण्यात आली आहे. रात्रंदिवस पोलिस महामार्गावर बंदोबस्तावर आहेत. दूध आणि भाज्या घेऊन येणारे ट्रक बंदोबस्तात पोहोचविण्यात येत आहेत. महामार्गावर बघेल तिकडे पोलिस दिसत असल्यामुळे आंदोलकांनी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी पाठ फिरविली आहे.
प्रशासन...
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस्
ाांनी महामार्गावर असलेल्या दूध डेअरीवर बंदोबस्त तैनात केला आहे. शहरात आंदोलनाची धार कमी झाली आहे. केवळ आता पोलिसांनी महामार्गावरच लक्ष केंद्रीत केले आहे. रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत पोलिस डोळ्यात तेल घालून बंदोबस्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील वाढे फाट्यावर ट्रक चालकाला मारहाण करून दरोड्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी वाहनांचीही तपासणी सुरू केली आहे.