कचऱ्यातून निघणार सोनं; आमच्या उदरनिर्वाहाचं नाणं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:43 AM2021-09-27T04:43:04+5:302021-09-27T04:43:04+5:30
सातारा : सराफा दुकानातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यावर शहरातील काही कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असं जर कोणी आपल्याला सांगितलं तर कदाचित ...
सातारा : सराफा दुकानातून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यावर शहरातील काही कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असं जर कोणी आपल्याला सांगितलं तर कदाचित आपल्याला हे पटणार नाही; परंतु हे खरं आहे. शहरातील जवळपास तीस-चाळीस दुकानांत मिळून चार ते पाच झारेकरी मोफत झाडू मारतात. झाडलेला कचरा टाकून न देता ते सोबत घेऊन जातात. त्या कचऱ्यातून शोधून काढलेले सोने विकून हे झारेकरी आपला उदारनिर्वाह चालवितात.
झाऱ्यातून सोने शोधून काढतात म्हणून या नागरिकांना झारेकरी असे म्हणतात. असे झारेकरी पुरुष व महिला सातारा शहरातील सराफा दुकानात गेल्या अनेक वर्षांपासून झाडू मारण्याचे काम करीत आहेत. जमा होण्याऱ्या कचऱ्याची माती एका लोखंडी घमेल्यात जमा केली जाते. नंतर त्या मातीला पाण्याने धुतले जाते.
झारेकरी या मातीतून सोन्याचे बारीक कण शोधून काढतात. दुकानात घडविलेल्या किंवा वितळविलेल्या सोन्याच्या दागिन्यांतील काहीअंश मातीत पडतो. पंधरा-वीस दिवसांच्या प्रयत्नांनंतर अर्धा ते एक ग्रॅम सोने त्यांना मिळते. या सोन्याची गोळी तयार करून ते विकली जाते. या माध्यमातून त्यांना महिन्याकाठी तीन ते पाच हजार रुपये मिळतात. मात्र, वाढती कारखानदारी, सोन्याचे वाढलेले दर यामुळे दुकान व कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या सोन्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे झारेकऱ्यांना पूर्वीसारखे दिवसही आता राहिलेले नाहीत.
(चौकट)
झारेकऱ्यांची संख्या घटली
साताऱ्यात पूर्वी झारेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. एक काळ असाही होता की हे झारेकरी दुकानांमधील कचराच नव्हे, तर ओढे व नाल्यांना फळ्या लावून त्यामध्ये साचणाऱ्या गाळातूनही सोने शोधून काढत. साताऱ्यात झारेकऱ्यांची वसाहतदेखील होती. त्यामुळे आजही येथील एका भागाला झारीचे बोळ म्हणून ओळखले जाते. काळ बदलला तसं सोनं मिळण्याचं प्रमाण कमी झालंं अन् झारेकरीही. आज हाताच्या बोटावर मोजण्याइतके झारेकरी असून, त्यांनीही उदरनिर्वाहाची नवी वाट शोधली आहे.
(कोट)
कचऱ्यातून सोनं शोधून काढणं मुळीच सोपे नाही. यासाठी बरीच मेहनत करावी लागते. बऱ्याचदा सोन्याचा साधा कणही सापडत नाही. दसरा, दिवाळी व सण उत्सवाच्या काळातच काही ग्रॅम सोने आम्हाला मिळते ते विकून आम्ही कुटुंबाची गुजराण करतो. आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही इतर कामांकडे वळलो आहोत.
- शांताराम रणदिवे, सातारा
(कोट)
साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून झारेकरी कचऱ्यातून सोने शोधण्याचे काम करीत आहेत. आपल्याकडे अशा लोकांना झारी म्हणूनच ओळखले जाते. केवळ उत्सव काळातच या लोकांना काही मिलिग्रॅम सोने मिळते. यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो.
- कुणाल घोडके, सराफ व्यावसायिक