अजिंक्यतारा मोहीम : तरुणाईच्या सहभागाने झाले श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 02:35 PM2020-01-03T14:35:47+5:302020-01-03T14:39:26+5:30
वणवे लावल्यामुळे दरवर्षी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते.
सातारा - वणवा लावणाऱ्यांशी मुकाबला करण्यासाठी तरूणाईच्या पहिल्या फौजेने अजिंक्यताऱ्यावर तब्बल दोन तास जाळरेषा काढण्यासाठी श्रमदान करून अजिंक्यतारा वणवामुक्त करण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला. ‘लोकमत’च्या पुढाकारातून व सातारा वनविभागाच्या सहकार्याने वनवामुक्तीच्या अभियानाचा प्रारंभ नववर्षाच्या पहिल्या सुर्यकिरणांच्या साक्षीने शाहूनगरमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत झाला होता.
वणवे लावल्यामुळे दरवर्षी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. आपण राहत असलेल्या शहराचे पर्यावरण चांगले राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे भान ठेवून या अभियानात तरूणाई सहभागी झाली. ढाणे क्लासेसचे कार्तिक रावळ, अभिषेक रावळ, विनय शेळके, किर्तीक नागोरी, यशराज काटकर सहभागी झाले होते. त्यांना वनमजुर वसंत पवार, गोरख शिरतोडे, अभिषेक जाधव, विजय जाधव यांनी साथ दिली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेले श्रमदान संध्याकाळी ६ वाजता संपले. प्रारंभी उपस्थितांना मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी मार्गदर्शन करून जाळरेषा काढण्याची गरज आणि पध्दती याविषयी माहिती दिली. यावेळी तब्बल १३ ठिकाणी जाळरेषा काढण्यात आली.
सावित्रीच्या लेकी करणार श्रमदान
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त साताऱ्यातील महिलांचा ग्रुप अजिंक्यताऱ्यावर श्रमदान करणार आहेत. मंगळाई मंदिर परिसरातून जाळरेषा काढण्याचा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीमाईला श्रमदानातून अभिवादनकरण्याचा अनोखा संकल्प ग्रुपच्यावतीने करण्यात आला आहे.
सहभागासाठी लोकमतचे आवाहन
वनवा मुक्तीचा हा उपक्रम लोकसहभागातून राबवला जात आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर दुपारी २ ते ५ या वेळेत १० नागरिकांचा एक ग्रुप जाळरेषा काढण्यासाठी श्रमदान करेल. वनकर्मचारी याकामी सहकार्य करणार आहेत. किमान १० नागरिकांच्या गटाने पर्यावरण रक्षणासाठी यात योगदान द्यावे. अधिक माहिती व नियोजनासाठी पत्रकार प्रगती जाधव पाटील ८७८८१३९९५४ येथे संपर्क साधावा.
श्रमदानासाठी येताना ही काळजी घ्या!
अजिंक्यतारा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. हे गवत वाढल्यामुळे नियंत्रीत जाळ केल्यानंतर आग भडकण्याची शक्यता असते. त्यामुळे श्रमदानासाठी येणाऱ्यांनी सक्तीने नायलॉनचे कपडे परिधान करणे टाळावे. डोंगरावर चढण असल्यामुळे पायात स्पोर्टस शुज असावेत. कुसळांचा त्रास होवू नये म्हणून जीन्स घालणे उत्तम. सोबत भरपूर पाणी घेणं अपेक्षित आहे.