‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं
By Admin | Published: December 13, 2015 01:07 AM2015-12-13T01:07:49+5:302015-12-13T01:16:10+5:30
म्हसवडमध्ये रथोत्सव : गुलाल-खोबऱ्याची उधळण करत गावातून मिरवणूकऽऽ’चा गजर!
म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत येथील श्री सिद्धनाथ-माता जोगेश्वरीचा रथोत्सव पार पडला. आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्रातील लाखो भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती.
यात्रेच्या मुख्यदिवशी शनिवारी पहाटे श्रींच्या मूर्तीची विधीवत पूजा करुन काकड आरती करण्यात आली. देवाच्या मूर्तीस अभिषेक करुन पंचधातूच्या श्रींच्या मूर्ती सालकरी व देवाचे मुख्य पुजारी राजेंद्र बुरंगे यांच्या घरी नेण्यात आल्या. दुपारी दोनच्या सुमारास मूर्ती पालखीत ठेवून वाजत-गाजत रथापर्यंत नेण्यात आली.
तेथे मूर्ती रथात स्थानापन्न करण्यात आल्या. यावेळी भाविकांनी ‘सिद्धनाथाच्या नावाचा जयघोष केला. भोजराज देवाच्या सासनकाठ्या व कऱ्हाड येथील मानाच्या काठ्यांची भेट झाली. भाविकांनी श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर रथोत्सवा प्रारंभ झाला.
गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथावर निशाने लावून सजविण्यात आला.
कऱ्हाड, कालगाव, ढेबेवाडी, जांभूळणी, शिराळा येथील मानाच्या काठ्यांच्या भेटीचा कार्यक्रम माणनदीच्या पात्रात पार पडला. त्यानंतर माळी, सुतार, लोहार समाजाच्या मानकऱ्यांनी रथ ओढण्यास सुुरुवात केली.
रथाच्या मार्गावर ठिकठिकाणी गुलाल, खोबऱ्याची उधळण केली केली जात होती. त्यामुळे रस्ते गुलालमय झाले होते. रथ सायंकाळी वडजाई ओढ्याजवळ आला असता रिवाजाप्रमाणे वडजाई देवीला साडी-चोळीचा आहेर करण्यात आला.
रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याला आहे. रथ ओढण्याचा मान माळी समाज व बारा बलुतेदारांना आहे. रथाचे स्वारथ्थ अजितराव राजेमाने, आबासाहेब राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, तेजसिंह राजेमाने, सयाजीराजे राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने विराजमान झाले होते.
गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. सातारा-पंढरपूर मार्गावरील मायणी चौक ते पोळ पंपच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती. यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केल्यामुळे यंदा म्हसवडमध्ये विक्रमी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रशासनालाही कसरत करावी लागली. (प्रतिनिधी)