थेट निधीमुळे गावात चांगलं काम : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:14 PM2019-03-17T23:14:41+5:302019-03-17T23:14:46+5:30
सातारा : ‘जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी चांगली कामे करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही हा आदर्श घेऊन आपल्या ...
सातारा : ‘जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी चांगली कामे करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही हा आदर्श घेऊन आपल्या गावाचा नावलौकिक वाढवावा. आता ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असल्याने त्यातून चांगली आणि दर्जेदार कामे उभी राहतील,’ अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
लिंबखिंड (सातारा) येथील विठ्ठल मंगलम कार्यालयात गावच्या विकासासाठी झटणाऱ्या गावकारभाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी बीकेटी टायर्स प्रस्तुत व पतंजली सहप्रायोजक ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’ वितरण कार्यक्रमात संजीवराजे बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, आवृत्तीप्रमुख दीपक शिंदे, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर जुबेर शेख, कºहाड येथील किसान टायर्सचे अरुण करांडे, उंब्रज येथील बालाजी टायर्सचे अभिजित जाधव, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती उत्तमराव माने, धामणेरचे आदर्श माजी सरपंच शहाजी क्षीरसागर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘सर्वसामान्यांचा दुवा म्हणून सरंपच काम करतात. तसेच त्यांच्या माध्यमातून गावात विकासेकामे होतात. सातत्याने लोकांशी संपर्क असल्याने गावातील अडीअडचणी त्यांना माहीत असतात. या अडचणी सोडविण्यासाठी सरपंच नेहमीच प्रयत्न करतात. गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी या नात्याने सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे काम कधीच कमी ठरत नाही. हेच अनेक सरपंचांनीही कामाच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे. त्याचबरोबर एखादं गाव काय काम करतं ते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून समोर आलं आहे. त्यामुळे अनेक गावे पाण्याने श्रीमंत झाली आहेत. जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठा टिकून राहतो. ‘लोकमत’ने सरपंचांना पुरस्कार देऊन प्रोत्साहानाचे काम केले आहे.’
प्रास्ताविकात संपादक वसंत भोसले म्हणाले, ‘‘लोकमत’ सरपंच अॅवॉर्डचे हे दुसरे वर्ष आहे. यावर्षी जिल्ह्यातील ३५० हून अधिक गावांचे प्रस्ताव आले होते. ‘लोकमत’ने आतापर्यंत विविध क्षेत्रात काम करणाºयांचा गौरव केला आहे. या पुरस्कारामुळे सरपंचांना यापुढेही चांगलं काम करण्याचं बळ मिळणार आहे.’
या कार्यक्रमाचे सुखदा आठले यांनी सूत्रसंचालन केले.
ग्रामपंचायतीमुळेच स्वच्छता पुरस्कार
संजीवराजे यांनी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सरपंचांना मागदर्शन करताना अनेक गावांतील कामांची वैशिष्टे सांगितले. यामध्ये कºहाड तालुक्यातील बनवडी गावाने घनकचरा व्यवस्थापनाबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला. तसेच जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनीही अशीच आदर्शवत कामे करावीत, असे सांगितले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांक आला आहे. यापाठीमागे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी स्वच्छतेचे काम केले होते. त्यामुळेच साताºयाचा गौरव झाला, असेही संजीवराजे यांनी सांगितले.
रवींद्र माने ‘लोकमत सरपंच आॅफ दि इअर’
बीकेटी प्रस्तुत व पतंजली सहप्रायोजक ‘लोकमत सरपंच अॅवॉर्ड’चे शनिवारी साताºयातील शानदार सोहळ्यात वितरण झाले. यावर्षीचा ‘लोकमत सरपंच आॅफ दि इअर’चा पुरस्कार पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील सरपंच रवींद्र माने यांनी पटकावला.
पाटण तालुक्यातील दुर्गम भागामध्ये मान्याचीवाडी वसली आहे. पूर्वी या गावामध्ये अनेक सुविधांचा अभाव होता. मात्र, या गावाने अल्पावधीतच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला. आरोग्य, शिक्षण, केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचत गट, प्लास्टिक वापर बंदी, सांडपाणी व्यवस्थापन, बंदिस्त गटार आणि शोषखड्डा अशा प्रकारचे सर्व उपक्रम गावात राबविण्यात आले. त्यामुळे निर्मल ग्रामपंचायत म्हणून मान्याचीवाडीची सध्या सर्वत्र ओळख आहे. राज्य शासनानेही या ग्रामपंचायतीची दखल घेतली असून, अनेक पुरस्कारानेही या ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले आहे. आरोग्य, शिक्षण आणि तंटामुक्त गाव ही त्रिसूत्री मान्याचीवाडीची असून, यावरच गाव एकसंध आहे.