होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:50+5:302021-07-03T04:24:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता अनेकांनी ठरलेले लग्न करण्याचं निश्चित केलं आहे. या पार्श्वभूमीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता अनेकांनी ठरलेले लग्न करण्याचं निश्चित केलं आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींनुसार थोडक्यात लग्न लागू लागलेत.
कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेले लग्नसोहळे पुन्हा लांबणीवर जाणार असे वाटत असतानाच काही अटींच्या आधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींच्या आधारावर लग्नसोहळे रंगू लागले आहेत.
चौकट :
या असतील अटी
लग्नसोहळ्यात २५ पेक्षा जास्त लोक चालणार नाहीत, असा शासनाचा आदेश आहे. या २५ जणांमध्ये वधू-वर, ब्राह्मण, वाजंत्री, स्वयंपाकी यांच्यासह वऱ्हाडी मंडळींचा समावेश आहे. लग्नसोहळ्यातही येणाऱ्या प्रत्येकाने मास्क आणि शारीरिक अंतर राखणे बंधनकारक आहे. सोहळ्यात अधिकचे लोक सहभागी करून घेतल्यास मंगल कार्यालयचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
परवानगीसाठी अग्निदिव्य
लग्न करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. लग्नसोहळा कुठं होणार यापासून त्यात कोण कोण सहभागी होणार, याची यादी दिल्यानंतर परवानगी देण्यात येते. गावपातळीवर याची जबाबदारी ग्रामपंचायतीला देण्यात आली आहे. परवानगी दिल्यानंतर नियमांचे उल्लंघन केले तर दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे.
शुभमुहूर्त
लग्नासाठी सर्वोत्तम मुहूर्त हा तुळशीच्या एकादशीनंतर असल्याचा मानला जातो. मात्र, कोविडची परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने अनेक कुटुंबांनी विवाह करण्याचं निश्चित केलं. जुलै महिन्यात ३, १८, २२, २५, २८, २९ या तारखेला शुभमुहूर्त असल्याची माहिती रविराज वाखनीस यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोट :
वधू-वर पित्याची कसरत
जाईल जाईल म्हटलं तरी कोरोना मुक्काम हलवायला तयार नाही. घरातलं शेवटचं लग्न म्हणून मोठं करू असा विचार होता. पण ठरलेलं लग्न किती दिवस लांबणीवर टाकणार. मग मोजक्याच पाहुण्यांना घेऊन माझ्या मुलाचं लग्न करायचं ठरवलं.
- पंढरीनाथ निकम, वरपिता, काळोशी
आयुष्यात एकदाच होणाऱ्या लग्नसोहळ्याचा कोरोनामुळे अजिबातच आनंद घेता आला नाही. लेकीचं कोडकौतुक करावं म्हणून बरंच काही ठरवलं होतं. पण कोविडमुळे काहीच करता आले नाही. विवाहाची वर्षपूर्ती दणक्यात करायचं ठरवून लेकीला नांदायला पाठवलं.
- मनोहर साळुंखे, वधूपिता, नागठाणे