आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी अधिकारी अन् कर्मचाऱ्यांना गुगल लोकेशन उपस्थिती, सातारा जिल्हा परिषदेचे एक पाऊल पुढे
By नितीन काळेल | Published: April 8, 2024 07:30 PM2024-04-08T19:30:53+5:302024-04-08T19:31:25+5:30
रुग्णांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार
सातारा : रुग्णांना चांगली सेवा मिळावी, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केंद्राबद्दल तक्रारी होतात त्या दूर व्हाव्यात. कामात सुधारणा होण्यासाठी सातारा जिल्हा परिषद प्रशासन अग्रेसर झाले असून सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुगल लोकेशनद्वारे उपस्थिती लावण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा कारभार आणखी सुधरणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेस आवश्यक आरोग्य सेवा तत्काळ मिळणे हा केंद्रबिंदू ठेवून आरोग्य केंद्राच्या कामकाजात सुधारणा करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य सेवेचा लाभ जनतेस होण्याच्यादृष्टीने उपाययोजनाही सुरू आहेत. यामध्ये काही स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तसेच रुग्णांच्याही तक्रारी प्राप्त होत असतात. या तक्रारींचे निवारण करणेही गरजेचे असते. यासाठीही गुगल लोकेशनचा पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज हे सकाळी साडे आठ ते दुपारी साडे बारा आणि त्यानंतर दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत लोकेशन शेअर करणे आवश्यक केले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असते. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने केंद्राच्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने भागातील उपकेंद्राच्या ठिकाणी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणे महत्वाचे आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे यांनीही आरोग्यसेवा सुधारण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. यासाठी ‘आपला दवाखाना’ला भेट देऊन अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात वेळेत हजर राहतात का याची पडताळणी केली. तेव्हा त्यांना दोन ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कामात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. यापुढेही कामात सुधारणा होण्यासाठी केंद्रांना अचानक भेटी देण्यात येणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील जनतेला आवश्यक सर्व आरोग्य सेवा मिळण्यासाठी १ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुगल लोकेशन शेअरबाबत सूचना करण्यात आलेली आहे. यामुळे लोकांना चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी