कृष्णेच्या पाण्यात गोपाळांनी फोडली दहीहंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:34 PM2017-08-16T23:34:24+5:302017-08-16T23:34:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा/वाई : संपूर्ण देशभरात गोपाळकाला अन् दहिहंडी सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतानाच सातारा जिल्ह्यानं मात्र नदी अन् तलावातील दहीहंडी फोडण्यासाठी गोपाळांनी धूम माजविली.
वाई येथे कृष्णा नदीत गंगापुरीतील ‘जाणता राजा’ तरुण मंडळातर्फे गेल्या तीन वर्षांपासून दहीहंडी सोहळा साजरा केला जातो. नदीच्या दोन्ही पात्रांवरील झाडांना दोर बांधून जवळपास तीस ते पस्तीस फूट उंच दहीहंडी उभारली जाते. त्यानंतर गंगापुरी-नावेचीवाडी गोपाळ पथकाचे सदस्य पाच ते सहा थर उभे करुन नदीत साहसी कामगिरी बजावतात.
जमिनीवर थर उभा करताना एवढी अडचण जाणवत नाही; परंतु नदीपात्रातील वाळूमुळे खालच्या थरातील तरुणांचे पाय घसरत असतात. अशातच वर चढणाºया मुलांचे पायही भिजलेले असल्यामुळे थर निर्माण करताना प्रचंड कसरत करावी लागते. तरीही गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या जिद्दीने ही दहीहंडी फोडण्याचा सोहळा यशस्वी केला जातो.
यंदा जवळपास अडीच ते तीन हजार वाईकर हा सोहळा पाहण्यासाठी घाटावर जमले होते, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शिंदे आणि उपाध्यक्ष अजित शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
फुटक्या तलावही रंगला
साताºयातील फुटक्या तलावातही बुधवारी रात्री दहीहंडी फोडण्याचा सोहळा रंगला. फुटका तलाव गणेशोत्सव मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात परिसरातीलच तरुणांनी ही दहीहंडी फोडली.