गोपूजला पाणी, मेथी, उसावर केमिकलचा थर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:12+5:302021-07-01T04:26:12+5:30
औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे डांबर प्रकल्प चालू असून, त्यातून निघणारे केमिकल, धूर यामुळे जवळ असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला ...
औंध : खटाव तालुक्यातील गोपूज येथे डांबर प्रकल्प चालू असून, त्यातून निघणारे केमिकल, धूर यामुळे जवळ असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ऊस व मेथी, कांदा पिकावर केमिकलचा थर साचल्याने त्याचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करून पिकांची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार, दि. ५ रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा येथील विकास घाडगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, माझी जमीन गोपूज येथील गट नं ८१३ मध्ये आहे. यामध्ये मेथी, ऊस, कांदा अशी पिके केली आहेत. माझ्या घराच्या पश्चिमेस राजपथ इन्फ्रा या कंपनीचे रस्त्याचे काम सुरू असून, डांबर प्रकल्प सुरू आहे, त्यातून बाहेर निघणाऱ्या केमिकलमुळे शेतीवर काळा थर साचला आहे, विहिरीतील पाणी रसायनयुक्त झाले आहे. हातातोंडाला आलेली मेथी आता विक्रीयोग्य राहिली नाही. माझी आजी उषाताई पंढरीनाथ माने यांना डांबराच्या धुळीमुळे दम्याचा त्रास सुरू झाला आहे. भारतीय संविधानाच्या कलम २१ प्रमाणे आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्प हलविण्याबाबत व नुकसान भरपाईची विनंती केली असता ते धमकीची भाषा करीत आहेत. त्यामुळे प्रकल्प सुरक्षित ठिकाणी हलवून नुकसानभरपाई मिळावी तसेच त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा कुटुंबीयांसह सोमवार, दि. ५ जुलै रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले आहे.
३०औंध०१/०२/०३
फोटो:-१)गोपूजनजीकच्या याच डांबर प्रकल्पामधून प्रदूषण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर काळा थर जमा झाला आहे. २)डांबर प्रकल्पामधून पडणाऱ्या केमिकलमुळे मेथीवर काळा थर आला आहे.