पाण्याच्या अर्धवट माहितीवर गोरे-शिंदेंचा थयथयाट!
By admin | Published: October 26, 2015 11:08 PM2015-10-26T23:08:16+5:302015-10-27T00:24:23+5:30
दिलीप येळगावकर : राज्य शासनाने अद्यादेशाद्वारे ८ आॅक्टोबरला ६२ कोटी दिल्याची माहिती
सातारा : ‘गेल्या २५ वर्षांत विजय शिवतारे यांच्याइतका आग्रही आणि दुष्काळ प्रश्नावर पोटतिडीक असलेला पालकमंत्री लाभला नसल्याने जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिहे-कटापूर योजनेसाठी त्यांच्याच प्रयत्नामुळे ८ आॅक्टोबर रोजी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने अद्यादेश काढून या योजनेसाठी ६२ कोटींचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली असून, आमदार शशिकांत शिंदे व आमदार जयकुमार गोरे हे अर्धवट माहितीच्या आधारे लोकांची दिशाभूल करत आहेत,’ असा घणाघात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.जिहे-कटापूर योजनेबाबत श्रेयवाद सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. येळगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेचा इतिहास मांडून सद्य:स्थितीचीही माहिती दिली. यावेळी खटाव तालुक्यातील पवारवाडी गावचे सरपंच रमेश जाधव उपस्थित होते. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, शशिकांत शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भोगले; पण यापैकी एकानेही दुष्काळ प्रश्नावर तळमळ दाखविली नाही. जिहे-कटापूर योजनेवर खटाव-माण तालुक्यांतील शेतकरी डोळे लावून बसले असताना राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीच्या शासनाने केवळ निधी मंजूर केल्याचे भासवले, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही. त्यामुळे या योजनेचे काम रखडले. साहजिकच त्याची निर्मिती किंमत वाढल्याने त्याचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला आहे,’ असा आरोपही येळगावकर यांनी केला.योजनेचा इतिहास सांगताना येळगावकर म्हणाले, ‘कर्नल आर. डी. निकम यांनी १९७८ मध्ये या जिहे-कटापूर योजनेची संकल्पना मांडली. त्यांनी शरद पवारांपासून इतर काही मुख्यमंत्र्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला; पण ही योजना कुणीच स्वीकारली नाही. १९९६ मध्ये युतीचे शासन आल्यानंतर निवृत्त अभियंता संघटनेने हा प्रस्ताव माझ्यापुढे ठेवला होता. हा प्रस्ताव तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांच्यापुढे ठेवल्यानंतर या योजनेचा सर्व्हे झाला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली. खातगुण येथे तत्कालीन मंत्री खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते योजनेच्या कामाची कुदळ मारण्यात आली. मंत्री गिरीश बापट, हिंदुराव नाईक-निंबाळकर व मी स्वत: योजनेसाठी प्रयत्न केले होते. आघाडी शासनाच्या काळात या योजनेच्या बोगद्याच्या कामाची यंत्रे बारामतीच्या जानाई-मळाई योजनेच्या कामासाठी पळविल्यानंतर मी विधानभवनापुढे उपोषण केले होते. या उपोषणानंतर सर्व साहित्य जिहे-कटापूर योजनेसाठी आणण्यात आले. पाटबंधारेच्या कामासाठी ‘हेड वाईज’ निधी मंजूर करण्यासाठी मी केलेला प्रयत्नानंतर राज्य शासनाने मंजूर केला.
तत्कालीन पालकमंत्र्यांनी लहरीप्रमाणे या योजनेकडे पाहिले त्यामुळे ५ ते १० कोटींच्यावर निधी मिळाला नाही. या योजनेसाठी ६८० कोटींचा खर्च येणार असून, त्यातील ३०६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. ६२ कोटींची भर पडल्याने या कामाला गती मिळेल, असा विश्वासही येळगावकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
काँगे्रस-राष्ट्रवादी नेत्यांवर साधला निशाणा
आ. शशिकांत शिंदे पालकमंत्री असताना त्यांनी तडजोड करून उरमोडीचे पाणी सांगलीकडे पळविण्याचा डाव आखला होता, तो आपण हाणून पाडला. आ. जयकुमार गोरे सत्ता असताना गप्प राहिले, आता अर्धवट माहितीच्या आधारावर बोलत आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निधी आणण्याबाबत काहीच हालचाल केली नाही. दुष्काळग्रस्तांसाठी विधानभवनापुढे आंदोलन करत असताना आ. बाळासाहेब पाटील माझ्यावर हसत होते. नाटक थांबवा, असं उपहासानं म्हणत होते; पण दुष्काळी तालुके त्यांच्या मतदारसंघाला जोडले गेल्यानंतर त्यांना दुष्काळाबाबत बोलण्याचा कंठ फुटला आहे, असे तीर सोडत येळगावकरांनी काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
पंचपक्वान्नाचे ताट
पंचपक्वान्नाचे ताट समोर ठेवून हात बांधून जेवायला लावायला सांगणाऱ्यापैकी काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेतेमंडळी होते. मात्र, पालकमंत्री विजय शिवतारे व माझ्या आग्रहामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिहे-कटापूर योजनेच्या कामाला गती देण्याची घोषणा करून राज्यपालांना पत्र लिहिले. राज्यपालांच्या सूत्रातून योजनेची सुटका करून घेतली, असेही येळगावकर म्हणाले.