गोरेंची जबाबदारी अन् जिल्ह््याची समीकरणे !

By admin | Published: May 10, 2016 01:57 AM2016-05-10T01:57:53+5:302016-05-10T02:32:14+5:30

कार्यक्रमात चक्क व्यासपीठावर रामराजे अन् पतंगराव यांच्यात ‘गुफ्तगू’ रंगले.

Goreen's responsibilities and the equations of the district! | गोरेंची जबाबदारी अन् जिल्ह््याची समीकरणे !

गोरेंची जबाबदारी अन् जिल्ह््याची समीकरणे !

Next

सागर गुजर - सातारा  -‘माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांना पक्षात पुढची जबाबदारी दिली पाहिजे,’ असा राजकीय बॉम्ब माजी मंत्री पतंगराव कदम यांनी टाकल्यानंतर काँगे्रसमध्ये किती धुरळा उडाला माहीत नाही... परंतु दुसऱ्या दिवशीच्याच कार्यक्रमात चक्क व्यासपीठावर रामराजे अन् पतंगराव यांच्यात ‘गुफ्तगू’ रंगले.
अगोदर जिल्हा परिषद, त्यानंतर विधानसभा अन् आता जिल्हा बँक या माध्यमातून टप्प्याटप्प्याने आपल्या राजकीय आक्रमकतेची व्याप्ती वाढवत चाललेल्या जयकुमारांनी लोणंद नगरपालिकेतही केलेली एन्ट्री अनेकांना खटकली. लोणंदचा अपक्ष नगरसेवक जयकुमारांच्या बंगल्यात मुक्काम ठोकतो, ही घटना राष्ट्रवादीसाठी जेवढी धक्कादायक, तेवढीच काँगे्रससाठीही आश्चर्याची होती.
माण-खटाव मतदारसंघाच्या बाहेर जाऊन जयकुमारांनी प्रत्येक तालुक्यात आपापली माणसे उभारण्याचा चंगच बांधला आहे. फलटणमध्ये रणजितसिंह असो, अथवा लोणंदमध्ये राहुल घाडगे. प्रत्येक ठिकाणी हक्काचा गट उभारण्याचा नवा प्रयोग काँगे्रस पक्षातीलच काही जुन्या प्रस्थापितांसाठी अस्वस्थ करणारा ठरला आहे. अशातच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी असलेली जवळीकही विरोधकांना त्रासदायक ठरू लागली आहे.
आजपर्यंत आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँगे्रस पक्षाने स्वत:चे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला. आनंदरावांचा स्वभाव शांत असल्याने विनाकारण विरोधकांना डिवचण्याचा प्रयोग त्यांच्या कारकिर्दीत खूपच कमी वेळा झाला. परंतु प्रत्येक विरोधकाला स्वत:हून अंगावर ओढवून घेण्याची सवय असणाऱ्या जयकुमारांनी जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडले. ‘गॉडफादर पृथ्वीराज चव्हाण’ एवढा एकच हुकमी एक्का आजपर्यंत आनंदरावांजवळ आहे. विशेष म्हणजे, जयकुमारांनीही हाच एक्का आपल्याजवळ ठेवला आहे. सोबत पतंगरावांचंही हुकमी पान त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे आंधळीच्या सोहळ्यात बोलताना पतंगरावांनी ‘जयकुमार यांना पुढची जबाबदारी द्यावीच लागेल,’ असे जे सूतोवाच केले आहे, ते कदाचित भविष्यातील पक्षीय फेरबदलाची नांदी ठरू शकते; परंतु ही जबाबदारी राज्य पातळीवरील असेल की जिल्हाध्यक्षपदाची, हे पाहण्याजोगे ठरणार आहे.


रामराजे पतंगरावांना काय म्हणाले असावेत?
जयकुमार गोरे हे पतंगरावांचे राजकीय मानसपुत्र तर रामराजेंचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. जयकुमारांना मोठं करण्याची भाषा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पतंगराव अन् रामराजे रयत शिक्षण संस्थेच्या सोहळ्यात सोमवारी एकत्र व्यासपीठावर आले. इतकंच नव्हे तर, या दोघांनीही बराच वेळ एकमेकांच्या कानात चक्क ‘गुफ्तगू’ही केले.

आमदार जयकुमार गोरे यांना पुढची कोणती जबाबदारी द्यायची, याबाबत माजी मंत्री पतंगराव कदम हे बोलले आहे, त्यामुळे त्यांनाच विचारलेले योग्य ठरेल. मात्र, अर्जुन काळेसारख्या जमिनीवर राहून काम करणाऱ्या माणसाला आम्ही आमच्या पक्षात योग्य पद दिल्याचे समाधान आहे.
- आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस

पतंगराव हे माझे मार्गदर्शक आहेत. माझ्यावर जबाबदारी देण्याबाबत त्यांनी आंधळीच्या कार्यक्रमातून जे काही भाष्य केले आहे, ते माझ्यासाठी खरोखरच गौरवास्पद आहे. पृथ्वीराज बाबा अथवा पतंगराव यांनी कोणतीही जबाबदारी दिली तरी ती पार पाडण्यास मी तयार आहे.
- जयकुमार गोरे, आमदार, काँगे्रस

Web Title: Goreen's responsibilities and the equations of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.