Lok Sabha Election 2019 महायुतीचे काम करण्याचा गोरेंचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:08 PM2019-04-10T23:08:56+5:302019-04-10T23:09:23+5:30

दहिवडी : ‘ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही. आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे ...

Goren's decision to work for the grand alliance | Lok Sabha Election 2019 महायुतीचे काम करण्याचा गोरेंचा निर्णय

Lok Sabha Election 2019 महायुतीचे काम करण्याचा गोरेंचा निर्णय

Next

दहिवडी : ‘ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही. आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल केले. एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेसने मला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अशा पक्षाबरोबर आघाडीधर्म कशासाठी पाळायचा?,’ असा प्रश्न आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
बोराटवाडी येथे आमदार गोरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला माण-खटाव विधानसभा मतदार संघातील दहा हजारहून जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसमध्ये राहायचे की जायचे, याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यकर्त्यांची मनोगते झाल्यानंतर गोरे यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली.
जयकुमार गोरे म्हणाले, ‘आमदार होण्यापूर्वी माण-खटावमधील उमेदवार फलटण, माणमधून ठरवला जायचा.
माण-खटाव तालुक्यातील लोकांना विश्वासात घेतले जात नव्हते. माण-खटावच्या मातीला जिल्ह्याच्या राजकारणात पत नव्हती. दुष्काळामुळे गावेच्या गावे स्थलांतरित झाली होती. उरमोडीचे पाणी माण-खटावच्या शिवारात खळखळणार म्हणून अनेकांनी केवळ मतांपुरते या मतदारसंघातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. तळागाळातील जनतेचा कधी विचार केला गेला नाही. केवळ मतांपुरते राजकारण त्यांनी केले. याला आता माझ्यासोबत माझे कार्यकर्तेही कंटाळले आहेत.
माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांचा मोठा हात आहे. इतक्या खालच्या पातळीवर राजकारण केले जाते. अशा प्रकारामुळे एखाद्याचे कुटुंब लयास जाईल. याचा कोणी विचार करत नाही. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने केले पाहिजे. समाजहित बाजूला ठेवून केवळ एकमेकांमध्ये वाद कसा होईल, हे पाहिले जाते.
यावेळी उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील यांचे कार्यकर्त्यांसह मेळाव्यात आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले, ‘माझे आणि जयकुमार गोरे यांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असे असताना आज आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माण-खटावला आगामी काळात कधी अंतर देणार नाही,’ या तालुक्यातील जनतेने दुष्काळ सोसला आहे. त्यांना कोणत्या समस्येतून जावे लागते, हे मी जानतो, असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला माण-खटाव विधानसभा मतदार संघातील सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
कार्यकर्त्यांचा कौल महायुतीकडे
ज्या राष्ट्रवादीने जयकुमारला संपविण्यासाठी जंगजंग पछाडले, माढ्याचा उमेदवार ठरवताना विश्वासात घेतले नाही, अशा राष्ट्रवादीच्या मागे जाणे म्हणजे माण-खटावचा स्वाभिमान गहाण टाकल्यासारखे आहे. महाआघाडीला मदत करायची की महायुतीला, याचा निर्णय मी तुमच्या पारड्यात टाकतोय, असे म्हणत आ. गोरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हात वर करून कोणाचे काम करायचे? याचा कौल मागितला. यावेळी उपस्थित समुदायाने हात वर करून फक्त महायुतीचेच काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आ. जयकुमार गोरे यांनी तुमचा निर्णय तो माझा निर्णय, असे म्हणत माढा लोकसभेला महायुतीचेच काम करणार असल्याचा निर्धार केला.

Web Title: Goren's decision to work for the grand alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.