कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी गोसाव्याचीवाडी ग्रामस्थांची एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:05 AM2021-05-05T05:05:15+5:302021-05-05T05:05:15+5:30
औंध : कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने बेडसाठी सामान्य माणसांची धावाधाव सुरू आहे. बेड मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा ...
औंध : कोरोनाचा विळखा घट्ट होत असल्याने बेडसाठी सामान्य माणसांची धावाधाव सुरू आहे. बेड मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. बेडसाठी गावातील कुणाला त्रास होऊ नये, यासाठी छोट्याशा गोसाव्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी एकजूट दाखवीत २६ बेड तयार करून मोठ्या गावासमोर आदर्श निर्माण केला आहे.
सध्या तरी सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. बाधित झाल्यास बेड मिळेल काय, या प्रश्नाने लोकांना ग्रासले आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. मात्र, प्रशासनावर किती दिवस अवलंबून राहायचे? त्यापेक्षा कोरोनाविरुद्धची लढाई आपणच स्वबळावर लढूया, असा निर्धार गोसाव्याचीवाडी ग्रामस्थांनी केला आणि सर्वांनी एकत्र येऊन त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करून दिले. गावातील ग्रामदैवत मंदिराच्या सभागृहामध्ये पुरुषांसाठी १५ खाटा, जिल्हा परिषदे शाळेच्या दोन वर्गखोल्यात महिलांसाठी ८ खाटा, ग्रामपंचायतीच्या वरच्या मजल्यावर एखाद्या घरातील पूर्ण कुटुंब बाधित आले तर त्यांची सोय व्हावी, यासाठी अशा एकूण २५ बेड ग्रामस्थांच्या वतीने विलगीकरण कक्षासाठी तयार करण्यात आलेले आहेत.
केवळ विलगीकरण कक्ष उभा करून चालणार नाही. कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण, सॅनिटायझर आणि इतर खर्चासाठी निधीचा प्रश्न पुढे आला. परंतु ग्रामस्थ, मुंबई-पुणे येथील चाकरमानी लोकांनी एकदिलाने लोकवर्गणी गोळा करून तब्बल लाख रुपयांहून अधिक निधी जमा केला आहे. एकीकडे मोठमोठी गावे कोरोनाच्या संसर्गाने ग्रासली असताना छोट्याशा वाडीने रडगाणे न लावता एकमेकांच्या हातात हात घालून कोरोनाच्या छातीवर पाय ठेवून लढाईसाठी कंबर कसली आहे. माजी सभापती संदीप मांडवे यांनी सातत्याने ग्रामस्थांच्या मदतीला धावून जात त्यांच्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
फोटो : खटाव तालुक्यातील गोसाव्याचीवाडी येथे ग्रामस्थांनी सुसज्ज विलगीकरण कक्ष उभारला आहे. (छाया : रशिद शेख)