जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना शासनाचा कृषी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:41 AM2021-04-02T04:41:17+5:302021-04-02T04:41:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : महाराष्ट्र शासनाने २०१८ व १९ या दोन वर्षांतील विविध कृषी पुरस्कार जाहीर केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्र शासनाने २०१८ व १९ या दोन वर्षांतील विविध कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार मिळाला आहे, तर एका शेतकऱ्याला पीक स्पर्धेतील विजेतेपद मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे.
राज्य शासनाच्या वतीने कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादनामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना विविध कृषी पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, कृषी सेवारत्न असे पुरस्कार देण्यात येतात. तसेच राज्यस्तरीय पीक स्पर्धेमधील विजेत्या शेतकऱ्यांनाही सन्मानित करण्यात येते.
मागील दोन-तीन वर्षे कृषी पुरस्कार जाहीर झाले नव्हते. बुधवारी शासनाने २०१८ आणि १९ या वर्षांतील कृषी पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याला पाच पुरस्कार मिळालेले आहेत.
२०१८ मधील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार जनार्दन संतराम अडसूळ (रा. तरडगाव, ता. फलटण) यांना जाहीर झाला आहे. कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार (रा. किन्हई, ता. कोरेगाव) येथील अशोक गजानन चिवटे यांना मिळाला आहे तर राज्यस्तरीय पीक स्पर्धेमध्ये देवेंद्र हनमंत यादव (रा. करंजे परळी, ता. सातारा) हे शेतकरी विजेते ठरले आहेत. सोयाबीनसाठी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
२०१९ मधील वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार माण तालुक्यातील वडजल येथील जनार्दन जोती काटकर यांना जाहीर झाला आहे. उद्यान पंडित पुरस्कार खटाव तालुक्यातील निमसोड येथील रामकृष्ण ज्ञानदेव वरुडे यांना तर वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (अ सर्वसाधारण गट) धनंजय भिकू चव्हाण (रा. म्हसवे, ता. सातारा) यांना जाहीर झाला आहे.
राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचा कौतुक होत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे.
.........................................................................