सरकारी मुर्दाडपणाची रस्त्यावरून वरात!

By admin | Published: December 23, 2014 09:43 PM2014-12-23T21:43:41+5:302014-12-24T00:23:46+5:30

रुग्णवाहिका चालकांचा नकार : आजारी आईसाठी ‘तो’ अर्धा किलोमीटर स्ट्रेचर घेऊन धावला --लोकमत विशेष

Government blurred on the streets! | सरकारी मुर्दाडपणाची रस्त्यावरून वरात!

सरकारी मुर्दाडपणाची रस्त्यावरून वरात!

Next

सातारा : सरकारी कारभाराबाबत लोकांमधून नेहमीच ओरड होत असते. प्रत्येक कामात पैसे मागण्याची सवय किती घातक बनत चाललीय, याचा धक्कादायक प्रत्यय देणारी घटना साताऱ्यात घडली. रुग्णवाहिकेअभावी आपल्या आजारी आईला स्ट्रेचरवरुन घेऊन जाताना एका हतबल गरीब मुलाला अर्धा किलोमीटर रस्त्यावर प्रचंड कसरत करावी लागली. मंगळवारी दुपारी सातारा शासकीय रुग्णालयात सरकारी मुर्दाडपणाची निघालेली ही ‘वरात’ हजारो लोकांनी याची देही याची डोळा पाहिली.
शांता बापूराव घाडगे (वय ७०, रा. फत्यापूर, ता. सातारा) या पाय घसरुन पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी पंधरा दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रिया कितपत यशस्वी झाली. हे पाहण्यासाठी त्यांच्या पायाचा एक्स रे काढण्याचा सल्ला रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनी मंगळवारी तिच्या मुलाला दिला.
एक्स रे काढण्यासाठी रुग्णालयातील कोणतीही सोय नसल्याने त्यांना सांगत खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे शस्त्रक्रिया झालेल्या वृद्ध आईला दुसऱ्या रुग्णालयात कसे न्यायचे, हा प्रश्न मुलासमोर उभा राहिला. त्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी घाडगे कुटुंबियांच्या दु:खाकडे डोळेझाक करत अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी केली. एवढे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने या हतबल मुलाने अखेर नाईलाजाने निर्णय घेतला.
रुग्णालयाच्या कोपऱ्यात पडलेले स्ट्रेचर घेऊन त्यावरच आईला ठेवले. अन् स्ट्रेचर स्वस्त: ढकलत तो रुग्णालयातून बाहेर निघाला. त्यावेळी रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला मदत करण्याचीही तसदी घेतली नाही.
स्ट्रेचर ढकलत तो शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला. सुमारे अर्धा किलोमीटरवरील पोवईनाक्याजवळ असलेल्या एका खासगी रुग्णालयात जायचे होते. मात्र, या मार्गात असलेल्या तीव्र चढावर स्ट्रेचर ढकलताना त्याला कसरत करावी लागली.
एक्स रे काढल्यानंतर सुमारे तासाभरानंतर पुन्हा आईला स्ट्रेचरवरच घेऊन तो जिल्हा शासकीय रुग्णालयात आला. या प्रकारामुळे शासकीय यंत्रणा किती संवेदनशून्य बनली आहे. याचा प्रत्येय पाहावयास आला. (प्रतिनिधी)


‘कट प्रॅक्टिस’चा विषय पुन्हा ऐरणीवर...
जिल्हा शासकीय रुग्णालयात एक्स-रेची सोय असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. परंतु, ही सोय असतानाही या रुग्णाला खासगी रुग्णालयाचा रस्ता कोणी व का दाखवला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘कट प्रॅक्टीस’संदर्भात ‘लोकमत’ने यापूर्वीच वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती.



सरकारी रुग्णवाहिकेला पैसे घेतले जात नाहीत. परंतु, अशाप्रकारे कोणी पैसे मागितले असतील तर त्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करू.
- डॉ. सुरेश जगदाळे,
जिल्हा शल्य चिकित्सक
सुरक्षा रक्षकांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले होते.
सातारा जिल्हा रुग्णालयातून शांता घाडगे यांना त्यांच्या मुलाने मंगळवारी असे स्ट्रेचरवरुन नेले.
 

Web Title: Government blurred on the streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.