प्रवाशांच्या सेवेसाठी सरकारी दस्तावेज सोशल मीडियावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:23+5:302021-01-13T05:41:23+5:30
सातारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ कार्यरत असलेल्या एसटीतील काही चालक-वाहक प्रवाशांशी फारच इमानदारी दाखवत आहेत. यासाठी दुसऱ्या दिवशीच्या नियोजनाचा तक्ताच ...
सातारा : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ कार्यरत असलेल्या एसटीतील काही चालक-वाहक प्रवाशांशी फारच इमानदारी दाखवत आहेत. यासाठी दुसऱ्या दिवशीच्या नियोजनाचा तक्ताच प्रवासी मित्रांच्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. सर्वसामान्य प्रवाशांना याची काहीही गरज नसताना ही ‘सेवा’ कशासाठी दिली जाते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असंख्य सातारकर पुण्यात नोकरी करत आहेत. त्यातील बहुतेकजण दररोज पुण्याहून साताऱ्याला ये-जा करत असतात. त्यांच्यासाठी सातारा-स्वारगेट विनाथांबा ही सेवा फारच उपयुक्त ठरत आहे. कित्येक वर्षांपासून ते या गाडीने जात असल्याने त्यांचे एसटीशी ऋणानुबंध तयार झाले आहेत. एसटीचे चालक, वाहक व प्रवासी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होतात. या सेवेचा नुकताच वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. या प्रवाशांनी ‘सातारा-स्वारगेट विनाथांबा’ हा सोशल मीडियावर ग्रुप तयार केला आहे.
राज्य परिवहन महामंडळात एसटीच्या फेऱ्या, चालक-वाहकांचे नियोजन आदल्या दिवशीच केले जाते. त्याला ‘अलोकेशन’ असे म्हटले जाते. त्यामध्ये गाडीचा मार्ग, वेळ, चालक-वाहकाचा बक्कल नंबर टाकला जातो. ही नोंदवही चालक-वाहकांच्या सोयीसाठी त्यांच्या ऑफीसीअल ग्रुपवर टाकला जाते. त्याच्याशी सर्वसामान्य प्रवाशांचा काहीही संबंध नसतो. तरीही काही चालक-वाहक न चुकता प्रामाणिकपणे सार्वजनिक प्रवाशांच्या ग्रुपवर ही माहिती टाकत असतात. यातून कोणती सेवा साध्य करतात हा प्रश्न आहे.
एका प्रवाशासाठी ४० जणांचा खोळंबा
एकाच मार्गावर सतत प्रवास केल्यामुळे काही प्रवाशांची चालक-वाहकांशी ओळख झालेली असते. त्यातून त्यांचे बक्कल नंबर मिळविलेले असतात. सकाळी उठायला उशीर झाला किंवा पुण्यातून कार्यालयातून वेळेत बाहेर पडणे शक्य नसल्यास संबंधित चालक-वालकाला फोन करून पाच, दहा मिनिटे थांबण्यास सांगितले जाते. ओळख असल्याने काही चालक-वाहक गाडी थांबवून ठेवतात. पण एका प्रवासी मित्रासाठी इतर चाळीस प्रवाशांचा खोळंबा केलेला असतो. हे विसरुन जातात.
कोट
अलोकेशनच केले नाहीतर आगारातून एसटी बाहेर पडू शकणार नाही. एसटीच्या दृष्टीने त्याला महत्त्व असते. ते चालक-वाहकांना माहीत व्हावे म्हणून कार्यालयात लावलेले असते. तसेच चालक-वाहकांच्या ऑफीशिअल ग्रुपवर पाठविले जाते. त्यात फारच गोपनियता असे काही नसते.
- संजय भोसले,
आगार व्यवस्थापक, सातारा.