शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही
By admin | Published: February 15, 2016 10:47 PM2016-02-15T22:47:13+5:302016-02-15T23:58:52+5:30
अजित पवार : विसापूर मेळावा; शेतकरी, उद्योजक समाधानी नसल्याचा आरोप
पुसेगाव : ‘राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे; पण या युती शासनाला पश्चिम महाराष्ट्राचा अभ्यास नाही. हे सरकार शेतकरी विरोधातील असल्याने सर्व कामे ठप्प आहेत. शिक्षक, उद्योजक व शेतकरी कोणीही या शासनाकडून समाधानी नाही. आपल्या येथील उद्योजकांना बाजूला सारून परदेशातील उद्योजकांना ‘मेक इन इंडिया’चा नारा देत रेड कारपेट टाकण्याची भाषा सुरू आहे. ग्रामीण भागातील कामगार चळवळ उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे,’ असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
दरम्यान, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसह इतर घटकांचे प्रश्न व न्यायासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्यासाठी तयार रहा, असे आवाहनही केले.
खटाव तालुक्यातील विसापूर येथे सरपंच सागर साळुंखे यांच्या माध्यमातून व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारण कामाची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. त्यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे-पाटील, प्रदीप विधाते, भाग्यश्री भाग्यवंत आदी उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘युती शासनाने राज्यावर पावणे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांना जाऊन एक वर्ष होत नाही तोपर्यंत संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान बंद केले आहे. आमच्या शासनाच्या काळात सुरू असणाऱ्या चांगल्या योजना या शासनाने बाजूला करून बंद केल्या आहेत.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. जागतिक बाजारात रुपया घसरत चालला असून, डॉलर वाढत आहे. शेजारच्या पाकिस्तानची भूमिका देशाला मारक असून, निष्पापांचा जीव जात आहे. तरी मोदी सरकार गप्प आहे.’ (वार्ताहर)