साताऱ्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

By नितीन काळेल | Published: December 14, 2023 04:47 PM2023-12-14T16:47:53+5:302023-12-14T16:49:07+5:30

मागण्या मान्य होईपर्यंत संपाचा निर्धार 

government employees marched to the collector's office for various demands including old pension In Satara | साताऱ्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

साताऱ्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

सातारा : जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला.

शासकीय, निमशासकीय कार्यालये, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपालिका, नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी विविध संघटनांच्या समन्वय समितीने जिल्ह्यात बेमुदत संप सुरू केला आहे. यामध्ये सर्वच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. यासाठी साताऱ्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 

तर जिल्हा परिषद कर्मचारीही चालत न्यायालयमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. याठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. जवळपास एक तासभर कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालले. यामध्ये शेकडोच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होत. तर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनादरम्यान, विविध संघटांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या राज्य शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती करण्यात आली. निवेदन दिल्यानंतर कर्मचारी आंदोलनस्थळावरुन संपावर गेले.

पंचायत समितीतील कर्मचारीही संपात..

जिल्हास्तरावरील कार्यालयातील कर्मचारी मागण्यांसाठी संपात सहभागी झाले आहेत. तसेच तालुकास्तरावरील कार्यालयातही याचा परिणाम दिसून आला आहे. पंचायत समितीतील कर्मचारीही संपात आहेत. त्यामुळे तेथील कामावरही परिणाम झालेला आहे.

Web Title: government employees marched to the collector's office for various demands including old pension In Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.