Government Employees Strike : सातारा जिल्ह्यातील २५ हजार राज्य कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:23 PM2018-08-07T14:23:05+5:302018-08-07T14:28:07+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी सहभागी झाले. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता.
सातारा : शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सातारा जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कर्मचारी सहभागी झाले. यामुळे सर्वच कार्यालयांमध्ये मंगळवारी सकाळपासून शुकशुकाट जाणवत होता.
दुपारी बाराच्या सुमारास जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर द्वारसभा घेण्यात आली. यामध्ये हा संप यशस्वी करण्याचा निर्धार सरकारी कर्मचाऱ्यांनी केला.
केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, यासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी बोलणी फिस्कटल्याने सर्व कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेले आहेत.
जिल्हा परिषदेत राजपत्रित अधिकारी व लिपिकवर्गीय संघटनांचे कर्मचारी कामावर होते. मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने बहुतांश कार्यालये ओस पडले होते. जिल्ह्यातील विविध भागातून शासकीय कामासाठी जिल्हा परिषदेत आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.
कऱ्हाड पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने
कऱ्हाड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर राज्य शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. सर्व कर्मचाऱ्यांनी गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार व तहसीलदार राजेंद्र शेळके यांना निवेदन दिले.