लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:56 IST2024-10-05T17:55:44+5:302024-10-05T17:56:12+5:30
आया-बहिणींना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी

लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील
सातारा : लाडकी बहीण योजनेसाठी श्रेयवाद सुरू आहे. त्यामुळे बहिणींनाच प्रश्न पडलाय की नेमकं कोठे जायचं. तिला माहीत आहे की, सख्खा भाऊ सत्तेत नसल्यामुळे यांच्याशी गोड बोलण्याशिवाय गत्यंतर नाही. खरं तर आज एकही बहीण सुरक्षित नाही. आया-बहिणींना सुरक्षा देण्यात हे सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे ही लाडकी बहीणच सरकारला जागा दाखवेल, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला.
सातारा जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा आल्यानंतर शाहू कला मंदिर येथे आयोजित मेळाव्यात ते बाेलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, दीपक पवार, जिल्हाध्यक्ष सुनील माने व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर सरकार शरण आल्यासारखे करत आहे. त्यांच्याकडून काही हवं असेल तर हीच वेळ आहे. परंतु, फक्त घोषणा मिळतील. सरकारने मोठ्या घोषणा केल्याचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर झाला आहे. २ लाख ३० हजार कोटी इतकी प्रचंड राजकोषीय तूट आहे. केलेल्या घोषणा व दिलेली कामे करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सर्व फाइल्सवर महसूल व वित्त विभाग निधी नसल्याचे लिहीत आहे.
तरीही अर्थमंत्र्यांचे न ऐकता, उपमुख्यमंत्र्यांकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री धडाधड योजना जाहीर करत आहेत. परंतु, बाणेदारपणा दाखवण्याऐवजी दोन्ही उपमुख्यमंत्री खुर्ची लाडकी असल्याने सोडायला तयार नसल्याचे पाटील यावेळी म्हणाले. दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस राजकुमार पाटील व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटलांसारखा अनुभव साताऱ्यात येईना
हर्षवर्धन पाटील यांना जो अनुभव इंदापूरला आला, त्यामुळे त्यांनी भाजप पक्ष सोडायचा निर्णय घेतला. त्यांच्यासारखा अनुभव अजून सातारकरांना येईना झालाय. तथापि, हळूहळू राज्यातील आणखी नेते खा. शरद पवार यांच्यासोबत दिसतील, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.