आठवडी बाजाराबाबत शासनाने निर्णय घेण्याची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:35+5:302021-09-27T04:42:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आठवडी बाजार बंद केले. बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल किंमत आली आहे. कोरोना काळात व्यापारी मालामाल झाले आहेत. बाजारतळ व मंडई बंद असल्याने व्यापारी व शेतकरी मिळेल त्या ठिकाणी मालाची विक्री करत आहेत. त्यामुळे शासनाने आठवडी बाजाराबाबत लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
गतवर्षी कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वत्र लाॅकडाऊन घोषित केला होता. यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवले होते. त्यावेळी अंशतः अत्यावश्यक व्यवहाराला थोडीफार सूट देण्यात आली होती. शेतकऱ्यांना ही शेतीमाल फिरून विक्री करण्यास परवानगी दिली होती.
त्यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू केले. मात्र, त्या काळातील आठवडी बाजाराची बंदी कायम ठेवली होती. आठवडी बाजार सुरू होतील, अशी आशा शेतकऱ्यांचे व्यापारी व सर्वसामान्य ग्राहकालाही होती. मात्र त्यातच कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. हळूहळू सुरू झालेले व्यवहार पुन्हा बंद झाले. त्यामुळे आठवड्याची बाजार सुरू होण्याची आशा मावळली.
गेल्या महिन्यापासून शासनाने टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरू केले आहेत तसेच शाळा-महाविद्यालयही ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे तर मंदिरे ही घटस्थापनेच्या दिवशी सुरू होत आहेत. तर सिनेमागृह व नाट्य मंदिरेही पुढील महिन्यात सुरू होत असल्याने शासनाने आठवडी बाजाराविषयी सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.
आठवडी बाजार बंद असल्याने तसेच सध्या शेतीमध्ये सुगीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विकण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तू व्यापारीवर्ग कवडीमोल भावाने विकत घेत आहेत तसेच बाजार व बाजारस्थळांवर विक्रेत्यांना बंदी असल्याने व्यापारी ही मिळेल त्या ठिकाणी शेतीमालाची विक्री करत आहे. त्यामुळे शासनाने लवकर हे आठवडी बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
(चौकट)
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले...
सुगीचे दिवस असल्याने शेतकरी वर्गाला बाजारपेठेत मालाची विक्री करण्यास वेळ नाही. शेतामध्ये आलेला शेतमाल मिळेल, त्या दराने विकून पुन्हा शेतात जात आहेत. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन व्यापारी कवडीमोल भावाने विकत घेत आहेत व दिवसभर चढ्या भावाने विकत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
फोटो... २६ मायणी
आठवडी बाजार बंद असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याकडेला चौकामध्ये मिळेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेतीमाल विकला जात आहे.
(छाया : संदीप कुंभार)