कोरोना काळात बँक कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:36 AM2021-04-12T04:36:36+5:302021-04-12T04:36:36+5:30
कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देत असणाऱ्या विविध बँकेतील कर्मचाऱ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सेवा देताना कोरोनामुळे ...
कुडाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देत असणाऱ्या विविध बँकेतील कर्मचाऱ्यांकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. सेवा देताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसाला शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सद्य:स्थितीत संपूर्ण जग हे कोरोनाच्या संसर्गाने ग्रासले आहे. गावागावांत रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांकडे मात्र शासनाची डोळेझाक होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजीचा सूर येऊ लागला आहे. कोरोना काळात पोलीस, डॉक्टर यांच्याबरोबरीने बँक कर्मचारीही शासन आदेशानुसार अत्यावश्यक सेवा म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. लोकांना सेवा देत आहेत. मात्र, या बँक कर्मचाऱ्यांना सामाजिक अंतराचे पालन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अगदी कडक लॉकडाऊन असतानाही त्यांनी आपली सेवा बजावली. या काळात ग्राहकांना सेवा देताना काही कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणामुळे प्राणही गमवावे लागले. काहींना दवाखान्यात उपचारासाठी दाखल व्हावे लागले. या कर्मचारी वर्गाच्या वैद्यकीय खर्चाबाबत शासनाने जबाबदारी घेणे आवश्यक होते. मात्र, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.