वर्ग सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी : शाळांनी दर्शविली तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:38 AM2021-01-20T04:38:21+5:302021-01-20T04:38:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाने शासनाच्या सूचना प्राप्त होताच अंमलबजावणीची तयारी दर्शविली आहे. शिवाय सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू असल्याने शाळांचीही पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास तयारी आहे. पालकांनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गतवर्षी मार्चपासून विद्यार्थी घरी आहेत. कोरोनामुळे या वर्षी आतापर्यंत ऑनलाईन अध्यापन सुरू होते. मात्र कोरोनाच्या रुग्णांची घटती संख्या व लसीकरणाची मोहीम सुरू झाल्याने पालकांमधीलही भीती कमी झाली आहे. मोबाईलद्वारे अध्यापनाच्या सवयीमुळे एकलकोंड्या बनलेल्या मुलांना आता मित्रांमध्ये मिसळता येणार असून ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष अध्यापनामुळे अभ्यासाचाही ताण काही अंशी कमी होणार असल्याने पालकही समाधानी आहेत.
कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून शाळांनी अध्यापनाची तयारी दर्शविली आहे. बहुतांश शाळा शासकीय आदेशाच्याच प्रतीक्षेत होत्या. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवसापासून शाळा गजबजणार आहेत.
विद्यार्थी उपस्थितीची शंभरी अद्यापही नाहीच
जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालयांचे वर्ग दि. २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. मात्र पहिल्या दिवशी फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होण्याचे प्रमाण सुधारले; मात्र विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण अद्यापही १०० टक्के असल्याचे दिसत नाही. पालकांच्या डोक्यातून अद्यापही कोरोनाची भीती जात नसल्यामुळे संमतीपत्र देण्यास ते नकार देत आहेत. लसीकरण सुरू झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे. पालकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
प्रतिक्रिया
वर्गातील प्रत्यक्ष अध्यापन व ऑनलाईन अध्यापनात फरक आहे. त्यामुळे शाळा सुरू करणे आवश्यक होते. यामुळे मुलांना त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर खेळता येईल.
- अंजली जाधव, पालक
कोरोनामुळे मोबाईल, टी.व्ही.समोर राहून मुले कंटाळली आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष वर्गातील अध्यापनास मुलांचा चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री वाटते.
- विनीत पाटील
पालक
शाळांकडून चांगली काळजी घेण्यात येते. शिवाय मुलांमध्येही चांगला बदल झाला आहे. त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.
- पांडुरंग पवार
पालक
शासनाच्या सूचनाप्राप्त होताच वर्ग सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे. शाळांनीही तयारी दर्शविली असून शासकीय नियमावलीचे काटेकोर पालन केले जाणार आहे.
- प्रभावती कोळेकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या
पाचवी : २८,६३२
सहावी : २६,८५८
सातवी : २६,५१९
आठवी : १७,८९७