कऱ्हाडात वीजबिले फाडून शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:21+5:302021-02-23T04:59:21+5:30
यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. ...
यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अॅड. समीर देसाई, उत्तमराव खबाले, राज्य संघटक दीपक पाटील, तात्या पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी दुपारी शहरातील दत्त चौकात जमा झाले. तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून शासनासह वीज वितरण कंपनीच्या धोरणाचा निषेध करीत बिले फाडण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कालावधीत राज्यातील शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सध्या शेतकरी व शेतमजुरांकडे घरखर्चासाठीही पैसे शिल्लक राहिलेले नाहीत. अशा कालावधीत शासनाने त्यांना मदत करणे गरजेचे असताना याउलट त्यांच्या शेतीपंपांचे व घरातील वीज कनेक्शन तोडण्याचे काम महावितरणच्या माध्यमातून सरकार करीत आहे. त्यातच, वीजबिले चुकीच्या पद्धतीने देण्यात आली आहे. भरमसाट वाढ करून शेतक-यांच्या माथी बिले मारण्यात आली आहेत. महावितरणने वसुली तत्काळ थांबवावी. ज्या शेतक-यांचे कनेक्शन तोडले आहे, ते कनेक्शन पूर्ववत जोडावे. अन्यथा, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
- चौकट
शासनच शेतक-यांना देणे लागते!
गतवर्षी नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, आजअखेर ती मदत मिळालेली नाही. उसाला एकरकमी एफआरपी मिळालेली नाही. पीकविमा मिळालेला नाही. अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळालेली नाही. अशा प्रकारे शासनच शेतक-यांना देणे लागत असताना कनेक्शन तोडण्याचे पाप शासनाकडून सुरू असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
फोटो : २२केआरडी०५
कॅप्शन : कऱ्हाडच्या तहसील कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वीजबिले फाडून शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध केला.