जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना शासनाकडून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:11 AM2021-03-13T05:11:14+5:302021-03-13T05:11:14+5:30
सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा ...
सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्य शासनाने बांधकाम कामगारांसाठी पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. या मदतीमुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला; परंतु ज्यांची नोंद कामगार आयुक्त कार्यालयाच्या दफ्तरी नव्हती, त्यांना मात्र वंचित राहावे लागले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद राहिले. हातावर पोट असलेल्या लोकांची उपासमार झाली. राज्यासह सातारा जिल्ह्यातील अनेक बांधकामे बंद राहिली. या बांधकाम कामगारांना आठवड्याला पैसे मिळत होते. मात्र बांधकामे बंद राहिल्याने आठवड्याला मिळणारे मजुरीचे पैसे बंद झाले. हे लॉकडाऊन दीर्घकाळ सुरू राहिल्याने मजुरांचा कोंडमारा झाला. तेव्हाच शासनाने बांधकाम विभागात काम करणाऱ्या मजुरांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा भत्ता जाहीर केला. दरम्यान, कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या कामगारांना ही मदत मिळाली. मात्र, ज्या कामगारांची नोंदणीच झाली नव्हती, ते या मदतीपासून वंचित राहिले आहेत.
जिल्ह्यातील बांधकाम कामगार : २५,२२२
पहिल्या टप्प्यात लाभ मिळालेले कामगार : १९,४५४
दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळालेले कामगार : १७,२0६
प्रतीक्षेतील कामगार : ५,७६८
एकाही अर्जात त्रुटी नाहीत तरी..
१. बांधकाम कामगारांची नोंद ही सहायक कामगार आयुक्त कार्यालयात करण्यात आलेली आहे. या कामगारांची यादी या कार्यालयाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ, मुंबई यांच्याकडे पाठविलेली आहे.
२. यादीमध्ये नोंदणीकृत २५ हजार २२ कामगारांना शासनाकडून मदत मिळणे अपेक्षित आहे; परंतु यापैकी अनेक कामगारांना पूर्ण पैसे मिळालेले नाहीत.
३. काही कामगारांना पहिल्या टप्प्यातील २ हजार रुपये मिळालेत, काहींना दुसऱ्या टप्प्यातील ३ हजार रुपये मिळाले आहेत. मात्र अनेकांना पूर्ण ५ हजार रुपये मिळालेले नाहीत.
४. दरम्यान, अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्याकडील कामगारांची नोंद कामगार आयुक्त कार्यालयात केली नसल्याने, जे खरोखर या मदतीसाठी पात्र आहे, त्यांना ही मदत मिळालेली नाही.
अधिकाऱ्याचा कोट..
कोरोनाच्या काळात बांधकाम कामगारांची उपासमार होऊ नये, या हेतूने शासनाने नोंदणीकृत कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली. सातारा जिल्ह्यातील कामगारांना देखील ही मदत देण्यात आलेली आहे. जे कामगार अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना लवकरच ही मदत त्यांच्या बँक खात्यावर मिळेल.
- चेतन जगताप,
सहायक कामगार आयुक्त, सातारा
काय म्हणतात कामगार...
कोट...
कोरोना काळात रोजगार बुडाला होता. शासनाने योग्यवेळी आम्हाला मदत जाहीर करून ती केल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे झाले. ही मदत झाली नसती तर आम्ही अडचणीत आलो असतो.
- सयाजी कुंभार, कामगार
कोट..
आम्ही अनेक वर्षे बांधकाम व्यवसायात मजुरी करत आहोत. आमची कोणी नोंदच घेत नाही. आमची नोंदणी केली गेली असती, तर आर्थिक मदत झाली असती. शासनाने आमची दखल घ्यावी.
- संतोष कदम, कामगार
नियोजनातील विषय