शासन म्हणतंय गर्दी टाळा; शासकीय कार्यक्रमात खुले आम फिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:27+5:302021-02-24T04:40:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शासन गर्दी टाळा म्हणून आवाहन करीत ...

The government says avoid crowds; Open public walks in government programs | शासन म्हणतंय गर्दी टाळा; शासकीय कार्यक्रमात खुले आम फिरा

शासन म्हणतंय गर्दी टाळा; शासकीय कार्यक्रमात खुले आम फिरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे शासन गर्दी टाळा म्हणून आवाहन करीत आहे, तर सरपंच आरक्षण सोडतीदरम्यान संबंधित प्रशासन कोणतीही काळजी न घेता भाऊगर्दीला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले. यावेळी ना सोशल डिस्टन्स, ना सॅनिटायझरचा वापर व मास्कचा अनेकांना विसर अशातच खुलेआम सरपंच आरक्षण सोडती पार पडल्या.

जगभर कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा विळखा घट्ट होत असताना शासनाने गर्दी टाळून सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडती पुन्हा काढण्यात आल्या. याप्रसंगी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झालेच नसल्याने आरोग्याचे तीन-तेरा वाजले असेच म्हणावे लागेल.

वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजविला असून, शासनस्तरावरून योग्य दखल घेत महामारी रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. या शासन निर्णयाला हरताळ फासण्याचे काम संबंधित विभागाकडून झाल्याचे दिसून आले. येथील बचत सभागृहात सकाळी दहा वाजेपासून तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांची रेलचेल होती. सरपंच आरक्षण सोडतीदरम्यान संबंधित अधिकारी उशिरा आल्याने काहीकाळ याठिकाणी ताणतणाव वाढलेला होता. उशिरा आगमन झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने घाईगडबडीत सरपंच आरक्षण सोडती कार्यक्रम सुरू केला. या ठिकाणी कोणतेच दिशादर्शक व मार्गदर्शक फलक आणि सॅनिटायझर नसल्याने येणारे लोक विनामास्क फिरत होते, तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याच मार्गदर्शक सूचना न करता हा कार्यक्रम पार पाडला.

तालुक्याचे जबाबदार अधिकारीच असे राजरोसपणे शासकीय कार्यक्रमात वावरू लागले तर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनता काय करीत असेल हा अंदाज लावणे महाकठीण आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोट :

आवश्यक ती काळजी घेऊनच कार्यक्रम

खटाव तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडतीदरम्यान कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतलेली होती. यावेळी नागरिकांनीही मास्कचा वापर केला होता. यादरम्यान झालेली नागरिकांची प्रचंड गर्दी आटोक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न होता, अशी माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिली होती.

फोटो : २३वडूज-सरपंच

खटाव तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडतीदरम्यान बचत सभागृहातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे कोरोनाला कसे रोखणार, असा प्रश्न पडत होता. (छाया : शेखर जाधव)

Web Title: The government says avoid crowds; Open public walks in government programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.