दिंडी सोहळ्याला शासनाने परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:24 AM2021-07-03T04:24:31+5:302021-07-03T04:24:31+5:30

चाफळ : आषाढी वारीला यंदाही वारकऱ्यांना जाता येणार नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने कोरोनाचे कारण देत ...

The government should allow the Dindi ceremony | दिंडी सोहळ्याला शासनाने परवानगी द्यावी

दिंडी सोहळ्याला शासनाने परवानगी द्यावी

Next

चाफळ : आषाढी वारीला यंदाही वारकऱ्यांना जाता येणार नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने कोरोनाचे कारण देत फक्त मानाच्या दहा दिंड्यांनाच परवानगी दिली आहे. या मानाच्या दिंड्या एस. टी. बसने ठराविक वारकऱ्यांना घेऊन जाणार आहेत. त्यामुळे यंदाही वारकऱ्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचं थेट दर्शन घेता येणार नाही. गावातल्या गावात अष्टमी ते बारशीपर्यंत दिंडी सोहळा साजरा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विभागातील वारकऱ्यांनी केली आहे.

यावर्षीही कोरोनामुळे पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचं नियोजन सरकारनं केलं आहे. वाखरीवरून प्रतिकात्मक स्वरुपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत. केवळ वाखरी ते पंढरपूर अशी दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून, एकादशी दिवशी शहरातील १९५ महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून, पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. मानाच्या १० पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० तर उर्वरित ८ दिंड्यांसाठी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधिक स्वरुपात पायी वारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहेत. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या सर्व बाबींमुळे सर्वसामान्य वारकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या वारकऱ्यांचा सरकारने सहानभूतीपूर्वक विचार करून किमान अष्टमी ते एकादशी बारशी दिवशी ५० वारकऱ्यांची संख्या निश्चित करून गावातल्या गावात दिंंडी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी चाफळ विभागातील वारकऱ्यांनी केली आहे.

Web Title: The government should allow the Dindi ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.