सांस्कृतिक कला केंद्रावरील कलाकारांना शासनाने मदत करावी : खामकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:00+5:302021-05-15T04:37:00+5:30
सातारा : जिल्ह्यातील सांस्कृतिक कला केंद्रावरील कलाकारांना रेशन कार्ड, शासकीय मानधन, मदत द्यावी आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, ...
सातारा : जिल्ह्यातील सांस्कृतिक कला केंद्रावरील कलाकारांना रेशन कार्ड, शासकीय मानधन, मदत द्यावी आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे सातारा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रशांत खामकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सांस्कृतिक कला केंद्रे आहेत. या ठिकाणचे कलाकार हे लोकांचे मनोरंजन करीत असतात, लोकांना आनंदी ठेवण्याचे काम या कलाकारांकडून होत असते, त्यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटण्याएवढेही उत्पन्न मिळत नाही, तसेच त्यांच्या गरजाही पूर्ण होत नाहीत.
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे सर्व सांस्कृतिक कला केंद्रे बंद आहेत. त्यामुळे यामधील कलाकारांचे उत्पन्नपण बंद आहे आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इतरांसमोर भीक मागावी लागत आहे.
हे कलाकार अनेक ठिकाणांवरून येत असतात. त्यामुळे त्यांचा कायमचा पत्ता नसल्यामुळे त्यांना रेशन कार्ड मिळत नाही आणि त्यामुळे धान्य मिळण्यास अडचण निर्माण होते.
सांस्कृतिक कला केंद्राच्या पत्त्यावर रेशन कार्ड देण्याची व्यवस्था करावी तसेच त्यांना शासकीय मानधन चालू करावे आणि शासकीय मदत द्यावी तसेच सर्वांची मोफत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
याचबरोबर माहितीसाठी आणि कार्यवाहीसाठी सातारा जिल्ह्यातील सांस्कृतिक कला केंद्रावरील ५०० कलाकारांची यादी, आधार नंबर आणि मोबाइल नंबरसहित दिली आहे.
मागणी निवेदनाची प्रत माहिती आणि कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनासुद्धा पाठविण्यात आली आहे.
या वेळी भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. उत्कर्ष रेपाळ, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, वैद्यकीय आघाडी सातारा शहराध्यक्ष डॉ. वीरेंद्र घड्याळे, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, उपाध्यक्ष चंदन घोडके, युवा मोर्चा सातारा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, सांस्कृतिक कला केंद्र कलाकारांचे प्रतिनिधी युवराज मोरकर आदी उपस्थित होते.