शासनाने हॉटेल व्यावसायिकांची वीजजोडणी तोडू नये : भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:32+5:302021-06-26T04:26:32+5:30
सातारा : ‘लॉकडाऊन शिथिल असल्याने हॉटेल्समध्ये पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्यास परवानगी दिली आहे. मात्र वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील ...
सातारा : ‘लॉकडाऊन शिथिल असल्याने हॉटेल्समध्ये पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना बसण्यास परवानगी दिली आहे. मात्र वीज कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यांना पंधरा दिवसांची मुदत मागूनही वीज कंपनी मुदत देण्यास तयार नाही. जबरदस्तीने ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. ते शासनाने थांबवावे,’ अशी मागणी सातारा एनएच ४ हॉटेल असोसिएशनच्या वतीने सागर भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे हॉटेलमधील कर्मचारी सांभाळणे, हॉटेलचा नियमित खर्च ठेवणे, आर्थिक परिस्थिती फारच अवघड झाली आहे तरीही इतक्या दिवसांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक व्यावसायिक सर्व ताकतीनिशी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सरकारच्या हातात असणारी वीज कंपनी जुलमी पद्धतीने वसुली करत आहे. याबाबतीत वीज कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतरही वरूनच आम्हाला आदेश आले आहेत, असे सांगितले जात आहे. या पद्धतीने वसुली होत राहिली तर लोकांचा शासनावर विश्वास राहणार नाही. पुढील काळात अनागोंदी कारभार सुरू होईल, कोणी सरकारचे ऐकणार नाही. वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. यासाठी वीजबिल भरण्यासाठी काही ठराविक काळाची मुदत द्यावी, सरकारला शक्य असेल तर काही अंशी सूट द्यावी. कोणाचेही वीजजोडणी तोडू नये.
याबाबत ‘राज्यभर वीजतोडणी मोहीम राबवली जात आहे. मात्र माझ्या पातळीवर काय करता येते का ते मी पाहतो,’ असे आश्वासन शेखर सिंग यांनी दिले.