दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावले कासव गतीने - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 01:06 AM2019-05-13T01:06:09+5:302019-05-13T01:06:24+5:30
म्हसवड (ता. माण) येथे बारामती अॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते.
म्हसवड (जि.सातारा) : दुष्काळी परिस्थिती आल्यावर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते. परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
म्हसवड (ता. माण) येथे बारामती अॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. पवार दिवसभर माण दौऱ्यावर होते.
पवार म्हणाले, आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे, हा प्रश्न आहेच. राज्यात दुष्काळाचे संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा.
पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत
पवार यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसान भरपाई मिळाली का? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.
खासदार निधीतून दीड कोटी
माण, खटाव तालुक्यांतील असंख्य गावे दुष्काळाचा सामना करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली आहेत. त्यांना पाठबळ देण्यासाठी डिझेलसाठी खर्च म्हणून खासदार निधीतून दीड कोटी रुपये लवकरच देण्यात येईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. पवार यांनी माण तालुक्याच्या दौºयात शिंदी खुर्द येथे कामाची पाहणी केली.
गावांसाठी तीस टँकर
माण, खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोहित पवार यांच्यातर्फे तीस टँकर पुरवण्यात येणार आहेत. हे टँकर पावसाळा सुरू होईपर्यंत मागणी होईल, त्या गावांना मोफत पाणी पुरवठा करतील, असे ते म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांना विचारला भावनिक प्रश्न
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २३ तारखेला बारामतीत अवश्य विजयोत्सव साजरा करावा. बारामतीचा आनंद घ्यायचा असेल तर तो त्यांनी अवश्य घ्यावा. तो प्रश्न नाही; पण येथे आज लोकांना पाणी नाही, जनावरांना चारा, पाणी नाही. माणुसकी म्हणून आपली काय जबाबदारी आहे का नाही? असा सवाल पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना केला.
असा होता दौरा..
पवार सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. बिजवडी, शिंदी येथे त्यांनी भेट दिली. वावरहिरे ग्रामस्थांशी संवाद साधला. भालवडी चारा छावणीस भेट दिली. पानवणला पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी केली.