गोपाळ समाजाच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:39+5:302021-07-23T04:23:39+5:30
सातारा : कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नसताना जगणे किती कठीण असते, याची जाणीव गोपाळ, कातकरी, भटक्या जमातीच्या लोकांच्या वस्तीमध्ये गेल्यावर ...
सातारा : कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नसताना जगणे किती कठीण असते, याची जाणीव गोपाळ, कातकरी, भटक्या जमातीच्या लोकांच्या वस्तीमध्ये गेल्यावर येते. मात्र, या गोपाळ लोकांच्या, भटक्या लोकांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या लोकांच्या घरकुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्यांना जगण्याचा हक्क तरी द्या, असे प्रतिपादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीचे संस्थापक व सातारा जिल्हा दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
वाघोली (ता. कोरेगाव) येथील गोपाळ लोकांच्या वस्तीवर दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी येथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. भरपावसात घरकुले नसताना पाल ठोकून राहणाऱ्या या लोकांच्या वस्तीत कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. त्यांना शासनाकडून घरकुल योजना जाहीर झाल्या आहेत, मात्र त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत.
ग्रामपंचायत, पंचायत समितीत घरकुलासंदर्भात चौकशी गेल्यास आम्हाला माहितीही दिली जात नाही. घरकुलासाठी जागा नाही, घरकुल नाही, त्यामुळे पाल ठोकून राहणाऱ्या आमच्या कित्येक पिढ्या आजही हलाखीचे जीवन जगत असल्याच्या व्यथा यावेळी गोपाळ समाजातील लोकांनी उमेश चव्हाण यांच्याकडे मांडल्या. यावेळी चव्हाण यांनी या सर्व लोकांच्या कुटुंबप्रमुखांची यादी करुन कोरेगाव पंचायत समितीकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे घरकुलांचा प्रस्ताव पाठविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
यावेळी दलित महासंघ सातारा जिल्हा युवक अध्यक्ष ओंकार निकम, रघुनाथ सकट, मंगेश चव्हाण तसेच गोपाळ समाजाचे मंदा जाधव, चंद्रकांत जाधव, नंदा जाधव, यशवंत चव्हाण, युवराज जाधव, सचिन चव्हाण, सागर चव्हाण, राजू पवार, दादू पवार, आकाश पवार, आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : वाघोली (ता. कोरेगाव) येथील गोपाळ वस्तीवरील लोकांच्या समस्या उमेश चव्हाण व दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या.
फोटो नेम : २१ जावेद