छत्रपती शिवरायांबद्दल 'अशी' विधाने करणे म्हणजे विकृती, राज्यपालांनी राजीनामा द्यावा - उदयनराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:56 PM2022-11-21T12:56:46+5:302022-11-21T12:57:28+5:30
शिवरायांवर वादग्रस्त टिपणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्यापेक्षा त्यांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. शिवरायांवर अनेकवेळा वेगवेगळी विधाने करण्यात आलेली आहेत. अशी विधाने करणाऱ्यांमध्ये विकृती असावी, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप खासदार उदयनराजे यांनी दिली.
राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. खा. उदयनराजे यांनीदेखील या वक्तव्याचा निषेध नोंदविला. ते म्हणाले, वादग्रस्त वक्तव्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्यपाल हे पद मोठे आहे. हे पद कोश्यारी यांना झेपत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. शिवरायांवर वादग्रस्त टिपणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
विचार करून बोलायला हवे : शिवेंद्रसिंहराजे
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून जनसामान्यांच्या भावना दुखावल्या जातील, अशी वक्तव्ये कोणीच करू नयेत. पदावर असणाऱ्या व्यक्तींनी तर करूच नये. यामुळे समाजामध्ये वाईट विचार पसरतात. अशा वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. जबाबदार व्यक्तींनी आपण काय बोलतो, त्याचा जनतेला काय संदेश जातोय, याचा विचार करून बोलले पाहिजे, अशा शब्दात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कान टोचले