फेसबुकवर गोविंद पानसरे अमर रहे!
By admin | Published: March 3, 2015 09:58 PM2015-03-03T21:58:08+5:302015-03-03T22:44:41+5:30
मृत्युनंतरही अकाऊंट सुरूच : चित्रफीत, ध्वनिफित, लेख अन् छायाचित्रांसाठी कार्यकर्ता पुढे सरसावला..
जगदीश कोष्टी -सातारा -‘गोळ्या झाडून माणूस संपविता येतो; पण विचार संपविता येत नाही,’ असं म्हटलं जातं. ‘अंनिस’चे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरही चळवळ अधिक जोमाने वाढत आहे. त्याचप्रमाणे कॉ. गोविंद पानसरे यांचेही आहे. त्यांच्यामागे त्यांचे विचार तरुणांंपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू असून, फेसबुकच्या माध्यमातून केले जात आहे.
कॉ. गोविंद पानसरे यांना आधुनिक यंत्रणा हाताळण्याची माहिती नव्हती; मात्र बदलत्या तंत्रज्ञानाची महती त्यांना चांगली होती. त्यामुळे त्यांचे सहकारी सुशील लाड यांनी कॉ. पानसरे यांच्या नावाने तीन-चार वर्षांपूर्वी फेसबुकवर अकाउंट काढून दिले. हे अकाउंट हाताळायची माहिती नसली तरी पोस्ट कशी करायची, लाईक करणे म्हणजे काय, कॉमेंट कशी टाकायची हे त्यांना कार्यकर्त्यांनी शिकविले होते.चळवळीत राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संघटनेचे अधिवेशन, आंदोलन किंवा बैठक असल्यास त्याची माहिती कार्यकर्त्यांना देण्यासाठी पानसरे हे फेसबुकचा वापर करत होते. त्याचप्रमाणे अर्थसंकल्प किंवा राज्य तसेच देश पातळीवरील नेत्यांच्या भाषणानंतर स्वत:चे मत नोंदविण्यासाठी पानसरे फेसबुकचा वापर करत होते.
त्यांना हवे असलेले मत ते लाड यांना सांगत अन् लाड त्यांचे मत अपलोड करत होते.
गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर त्यांचे अकाउंट बंद न करता ते तसेच पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे असंख्य कार्यकर्ते, तरुणाई चळवळीशी जोडली गेली आहे.
विविध पुस्तकांमधून पानसरे यांनी व्यक्त केलेले विचार, मत-मतांतरे, त्यांच्या भाषणाच्या चित्रफित, ध्वनिफित, फोटो, दुर्मीळ लेख फेसबुक मित्रांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा लाड यांचा मानस आहे. (प्रतिनिधी)
कॉ. गोविंद पानसरे यांचे फेसबुक अकाउंट तीन ते चार वर्षांपासून मी चालवत आहे. फेसबूकवर काही पोस्ट करायचे असले की ते मला सांगत असत. हे अकाउंट यापुढेच चालूच ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या अकाउंटला पाच हजार मित्र झालेले आहेत. त्यांच्या फालोअर्सची संख्या वाढत आहेत. त्यामुळे फेसबुक अकाउंटचे आता पेजमध्ये रूपांतर करण्याचा मानस आहे.
- सुशील लाड
चळवळीतील कार्यकर्ते.
‘कार्ल मार्क्स’चा चाहता
पानसरे यांनी फेसबुक अकाउंटमध्ये स्वत:विषयी लिहिताना म्हटले आहे की, ‘कम्युनिस्ट पक्षात मी कार्यरत असून, कार्ल मार्क्सचा मोठा चाहता आहे. महाराष्ट्रात समता प्रस्तापित करण्यासाठी मी संघर्ष करत राहीन आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एक भाग बनणार आहे.’