जीपीएसह्ण बंद.. सोळा घंटागाड्यांना दंड : सातारा पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:02 AM2019-11-20T10:02:54+5:302019-11-20T10:03:34+5:30
घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला नवीन वर्षात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
सातारा : शहरातून कचरा संकलनाचे काम करणाऱ्या चाळीस घंटागाड्या पालिकेने जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) प्रणालीशी जोडल्या आहेत. या प्रणालीमुळे कचरा संकलनाच्या कामात पारदर्शीपणा येऊ लागला आहे. परंतु जीपीएस प्रणाली बंद असल्यास घंटागाडी चालकावर दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. गेल्या चार महिन्यांत सोळा घंटागाडी चालकांवर कारवाई करून ८ हजार १०० रुपये दंड पालिकेने वसूल केला आहे.
घंटागाडी प्रभागात येत नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे घंटागाड्या जीपीसएस प्रणालीला जोडण्याची मागणी वारंवार केली जात होती. या मागणीला नवीन वर्षात मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. सातारा पालिकेच्यावतीने स्वच्छतेचा ठेका ह्ययशश्रीह्ण या खासगी कंपनीला देण्यात आला आहे. ही कंपनी चाळीस घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरात कचरा संकलनाचे काम करीत आहे.
ठेका बदलल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व चाळीस घंटागाड्या जीपीएस प्रणालीशी जोडल्या. प्रत्येक घंटागाडीवर एक चीप बसवण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून दिवसभरात संबंधित घंटागाडी कुठे व कोणत्या भागात किती फिरली, एका ठिकाणी किती वेळ थांबली, कचरा संकलन करून ती डेपोपर्यंत पोहोचली की नाही, याची माहिती अधिकाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. जीपीएस प्रणाली जर बंद असेल तर संबंधित घंटागाडीचालकाकडून प्रतिदिन १०० रुपये दंड वसूल केला जात आहे. तसेच कामगार नसल्यास १००, कचरा झाकून न नेल्यास ५०, गाडीला स्वच्छता जागृती फलक नसल्यास २५ तर घंटा नसल्यास २५ रुपये दंड आकारला जात आहे.
त्यानुसार १ जुलै ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत पालिकेच्या आरोग्य विभागाने जीपीएस बंद असलेल्या, कचरा झाकून न नेणाºया, घंटा नसलेल्या, फलक नसलेल्या एकूण सोळा घंटागाडी चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. संबंधितांकडून ८ हजार १०० रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
स्वच्छ सातारा.. सुदंर साताराह्ण ही संकल्पना साकार करण्यासाठी पालिकेचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. पालिकेने घंटागाड्या जीपीएस प्रणालीशी जोडल्या आहेत. त्याचे चांगले परिणामही आता दिसू लागले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. कामकाजात पारदर्शीपणा यावा, हाच या मागचा उद्देश आहे.
- शंकर गोरे, मुख्याधिकारी