ग्रामपंचायतींना खरेदी करता येणार ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:32+5:302021-05-14T04:39:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संकट असून ऑक्सिजनचीही समस्या आहे. या पार्श्वभूमीवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे संकट असून ऑक्सिजनचीही समस्या आहे. या पार्श्वभूमीवर १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायतींना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन खरेदी करता येणार आहे. याबाबतचा निर्णय सातारा जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यामुळे एखाद्या रुग्णाची ऑक्सिजनअभावी होणारी गैरसोय टाळता येणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था न होणे अशा अनेक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विलगीकरण कक्षेत असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. दुसरीकडे व मोठ्या रुग्णालयात रुग्णाला नेताना प्रवासामध्ये ऑक्सिजनची गरज भासते. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावरील १५ व्या वित्त आयोग निधीमधून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन खरेदी केल्यास संबंधित रुग्णाला फायदा होऊ शकतो. तसेच त्या रुग्णाची काही काळासाठी तरी गैरसोय दूर होऊ शकते. याच विचारातून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मशीन खरेदीबाबत निर्णय घेतला आहे.
यासाठी ग्रामपंचायत विकास आराखडामध्ये काही बदल करायचा असल्यास त्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतात. आता मशीन खरेदी कामाच्या प्रस्तावांना जिल्हा स्तरावरून मान्यता द्यायची झाल्यास विलंब लागू शकतो. हा विलंब टाळण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना मान्यतेचे अधिकार देण्यात आले आहेत. यामुळे ग्रामपंचायतींना मशीन खरेदी करता येणार आहे. याचा फायदा अनेक रुग्णांना होऊ शकतो.
\\\\\\\\\\\\\\\\\\\