कार्वे गटात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:24+5:302021-01-14T04:32:24+5:30
कार्वे : कार्वे जिल्हा परिषद गटात कार्वेसह गोळेश्वर, कोडोली, शेरे, शेणोली, गोवारे ग्रामपंचायत निवडणुकींत काँटे की टक्कर होत आहे. ...
कार्वे : कार्वे जिल्हा परिषद गटात कार्वेसह गोळेश्वर, कोडोली, शेरे, शेणोली, गोवारे ग्रामपंचायत निवडणुकींत काँटे की टक्कर होत आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होत आहेत. त्यामुळे गावागावांतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रचाराच्या गाड्या गल्लोगल्ली फिरत असून उमेदवारांनीही पायाला भिंगरी बांधली आहे.
कार्वे विभागातील कार्वेसह अन्य गावांच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये गोळेश्वर ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी होत असून कार्वे, कोडोली, शेरे, शेणोली, गोवारे याठिकाणी दुरंगी लढत होत आहे. या गावांमधील निवडणूक चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. विभागात कार्वेची ग्रामपंचायत मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. या ग्रामपंचायतीच्या गत निवडणुकीत भाजपने आपली सत्ता कायम राखली होती. विरोधी गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, या निवडणुकीत महाआघाडीच्या माध्यमातून विरोधी गटाची ताकद वाढली असून सत्तांतर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. एकीचे बळ वापरून महाआघाडी रिंगणात उतरली आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये २ तर वॉर्ड क्र. ३ मध्ये १ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या अपक्षांचा तोटा कोणाला होणार, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व भाजपचे निवासराव पाटील, उपसरपंच रोहित जाधव, वैभव थोरात हे करीत असून महाआघाडी पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच वैभव थोरात, रंगराव थोरात, संताजी थोरात, जयवंतराव थोरात हे करीत आहेत. भाजप आपली सत्ता कायम राखणार की, महाआघाडी सत्तांतर घडविणार, याची उत्सुकता विभागाला लागून राहिली आहे.
- चौकट
संजयनगर बिनविरोध, गोळेश्वरला तिरंगी
विभागातील संजयनगर-शेरे ग्रामपंचायत स्थापनेलाच बिनविरोध झाली आहे. गावाने गटातटाच्या राजकारणाला फाटा देत निवडणूक बिनविरोध केली. तर कोडोलीतील सहा उमेदवार बिनविरोध झाले आहेत. गोळेश्वरमधील दोन उमेदवार बिनविरोध झाले असून येथे तिरंगी लढत होत आहे.