Gram Panchayat Election: मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाइल, वाहनास बंदी, लोणंद पोलिसांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 04:14 PM2022-12-16T16:14:19+5:302022-12-16T16:15:05+5:30
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज
आदर्की : सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी रविवार (दि.१८) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेस बांधा आणल्यास कारवाई करण्यात येणार असून निवडणूक केंद्रांवर मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी दिली. आदर्की खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात ग्रामस्थ, उमेदवार, पॅनेल प्रमुख यांच्या बैठकीत ते बोलत होते.
वायकर म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान प्रचारसभेत टीकाटिप्पणीमुळे गावची शांतता भंग होऊन कायदा, सुव्यवस्था बिघडली तर संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. मतदारांवर दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडा. मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतराच्या आत मोबाइल, वाहने आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबरच उमेदवार प्रतिनिधीने मतदान केंद्रात प्रवेश केल्यास चार तास बाहेर येऊ नये. मतदान केंद्राबाहेर टेबलावर तीन व्यक्तींनीच थांबावे अशा सूचना देत मतदान प्रकिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.
यावेळी सहायक पोलिस निरीक्षक स्वाती पवार, अविनाश नलवडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, पोलिस पाटील महेश निंबाळकर, पॅनेल प्रमुख उमेदवार, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.