Gram Panchayat Election: कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र ११ वाजेपर्यंत स्पष्ट होणार
By प्रमोद सुकरे | Published: December 19, 2022 05:34 PM2022-12-19T17:34:55+5:302022-12-19T17:35:20+5:30
सर्वांनाच निकालाची उत्सुकता
कऱ्हाड : तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींसाठी काल, रविवारी (दि. १८) मतदान प्रक्रिया पार पडली. चुरशीने सुमारे ८२ टक्के मतदान झाले असून त्याची मतमोजणी उद्या, मंगळवारी (दि २०) होत आहे. सकाळी ११ पर्यंत सर्व ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येऊन चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.
कराड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. यासाठी निवडणूक विभागाने शिस्तबद्ध नियोजन केल्याने शांततेत मतदान पार पडले. उमेदवारांचे भविष्य पेटीबंद झाल्यानंतर आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे.
मंगळवार दिनांक २० रोजी सकाळी ७:३० वाजता मतमोजणीसाठी सर्वांना बोलावण्यात आले आहे. त्यासाठी २० टेबल ची व्यवस्था करण्यात आली असून २६ निवडणूक निर्णय अधिकारी ,३३ सहाय्यक निवडणूक अधिकारी व ४० इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर २८ अधिकारी व २० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.
मतमोजणी ही २ टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात हनुमानवाडी, वनवासमाची, ओंडोशी, चोरजवाडी, तारुख, दुशेरे, हिंगगोळे ,घोलपवाडी, अंतवडी, वडगाव हवेली, आणे, पाडळी हेळगाव, मनू, कासारशिरंबे, पश्चिम सुपने, किवळ, येळगाव, आटके,चरेगाव, तळबीड या २० गावांची मतमोजणी होणार आहे. तर दुसर्या टप्प्यात जुने कवठे, विजयनगर ,डेळेवाडी, धावरवाडी, वानरवाडी ,जुळेवाडी, गणेशवाडी, शामगाव ,कुसुर, कालगाव, रेठरे खुर्द, कोरेगाव, सुपने या १३ गावांची मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी दिली.