जिल्ह्यात ग्रामपंचायत रणधुमाळीला सुरुवात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:02 AM2021-01-08T06:02:51+5:302021-01-08T06:02:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी दीडशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, अर्ज माघारच्या शेवटच्या दिवशी ...

Gram Panchayat Ranadhumali begins in the district .. | जिल्ह्यात ग्रामपंचायत रणधुमाळीला सुरुवात..

जिल्ह्यात ग्रामपंचायत रणधुमाळीला सुरुवात..

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यातील ८७८ पैकी दीडशेहून अधिक ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, अर्ज माघारच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना चिन्हांचे वाटपही झाले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी दुरंगी आणि तिरंगी लढतीच पाहावयास मिळणार आहेत.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक गावांत मनोमिलनाचे वारे होते. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक पूर्णत: बिनविरोध पार पडली. तसेच अशंत: बिनविरोध निवडणूक होणाऱ्या गावांची संख्याही दखल घेण्यासारखी आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये पाटण, माण, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई या तालुक्यात चुरशीची निवडणूक होईल. माण तालुक्यात ६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी माणमधील १४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये मोही, मार्डी, लोधवडे, जाशी या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सध्या ३३५ जागांसाठी ७२२ जण रिंगणात राहिले आहेत. फलटण तालुक्यात ८० पैकी ६ ग्रामपंचातींची निवडणूक बिनविरोध पार पडली. आता ५७४ जागांसाठी १२७० जण लढणार आहेत. तर १३८ जणांची निवड बिनविरोध झालेली आहे.

खंडाळा तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली आहे. त्यामधील ७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, यामध्ये पळशी, कान्हवडी, घाडगेवाडी, लिंबाचीवाडी आदींचा समावेश आहे. सध्या ३२० जागांसाठी ७५७ जण रिंगणात आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मोठी आहे. ४२ पैकी २८ गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. सध्या ४५ जागांसाठी ९७ जण निवडणूक लढवित आहेत. पाटण तालुक्यात १०७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. १८ गावची निवडणूक बिनविरोध झाली असून ११४४ उमेदवार रिंगणात आहेत.

चौकट :

कऱ्हाडला १७ ग्रामपंचायती बिनविरोध...

कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यामधील १७ गावांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १०२४ जागा निवडून द्यायच्या असून, २४६ सदस्य बिनविरोध निवडले आहेत. सध्या ७७८ जागांसाठी १६३२ जण निवडणूक रिंगणात आहेत. जावळी तालुक्यातील ७५ पैकी ३७ गावांची निवडणूक होत आहे. कोरेगावमध्ये ५६ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामधील ७ बिनविरोध झाल्या आहेत. वाई तालुक्यात ७६ पैकी ९ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

................................... ...................

Web Title: Gram Panchayat Ranadhumali begins in the district ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.