ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी ठरावाची परीक्षा!

By admin | Published: May 1, 2017 12:01 AM2017-05-01T00:01:50+5:302017-05-01T00:01:50+5:30

ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी ठरावाची परीक्षा!

Gram Panchayats to be examined for the liquor viaduct! | ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी ठरावाची परीक्षा!

ग्रामपंचायतींमध्ये दारुबंदी ठरावाची परीक्षा!

Next


सातारा : जिल्ह्यातील सुमारे १५०० ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी ग्रामसभा होणार असून, अनेक ग्रामपंचायतीत दारूबंदीचे ठराव घेण्यासाठी तरुणाई सरसावली आहे. त्यासाठी गावोगावी जागृती सुरू असून ठराव पारित करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या ग्रामसभेकडे प्रशासनाचेही लक्ष असणार आहे. तसेच काही ठिकाणी ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामपंचायतीला निवेदन देऊन दारूबंदीचा ठराव घेण्यात यावा, अशीही मागणी केली आहे.
गावातील ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभेतील ठरावावरच गावचे राजकारण, विकास ठरत असतो. त्यामुळे ग्रामसभेत वाद, मारहाणीचे प्रकारही घडत असल्याचे दिसून येते. आता दि. १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेकडे सर्वांचे लक्ष आहे. जिल्ह्यातील किती ग्रामपंचायती दारूबंदीचे ठराव होणार याकडे प्रशासनाचेही लक्ष राहणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींना ग्रामस्थांनी निवेदन देऊन १ मे रोजीच्या ग्रामसभेत दारू व्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे सुचविण्यात आले आहे. तसेच हा विषय विषयपत्रिकेवर घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत सातारा तालुक्यातील वडूथ ग्रामपंचायतीलाही ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. सरपंचांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीत सर्व प्रकारच्या दारू व्यवसायाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. संबंधित विषय १ मे रोजीच्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात यावा. ग्रामपंचायत हद्दीत यापुढे कायमस्वरुपी दारूबंदीचा ठराव करण्यातचा ठराव घ्यावा. यापूर्वी दिलेल्या आणि अद्यापही सुरू न झालेल्या सर्व प्रकारच्या दारू विक्री दुकानांचे ना हरकत रद्द करण्यात यावे. तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वडूथ गावाला धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, ऐतिहासिक तसेच देशसेवेचा वारसा आहे. गावात निरोगी आणि निर्व्यसनी आयुष्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. व्यसनामुळे चांगली गोष्ट होत नाही. कुटुंबालाही त्याची झळ बसते. अशामुळे ग्रामपंचायत हद्दीत दारू दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
या निवेदनावर मदन साबळे, अजित साबळे, छाया साबळे, पूनम साबळे, प्रियांका साबळे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
खटावमध्ये ग्रामसभा ठरावांकडे लक्ष
खटाव तालुक्यातील १३९ ग्रामपंचायतींमध्ये सोमवारी होणाऱ्या ग्रामसभेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या दारूबंदी ठरावाकडे तालुक्यातील महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. तर तालुक्यात वडूज नगरपंचायत एकमेव असल्याकारणाने येथील काही सदस्यांनी सह्यांचे लेखी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले आहे. गावोगावी होणाऱ्या ग्रामसभेत बहुतांशी महिला उपस्थित राहणार असून, ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के आरक्षण असल्याने महिलांचे मनोबल वाढले आहे. तर हा ठराव होऊ नयेत, यासाठी दारू विक्रेत्यांची धावपळ सुरू आहे. वडूजमधील काही नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या जागेत कोठेही दारूविक्री करण्यासाठी परवानगी देऊ नये, असे निवेदन दिले आहे.
दारुबंदीची ओळख जपण्यासाठी जागरुक...
दि. १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनानिमत्त होणाऱ्या ग्रामसभेत जावळी तालुक्यात दारू दुकानांना परवाने देऊ नयेत, असा ठराव करण्यात येणार आहे. तालुक्यातील सुमारे १२५ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, २००८ पासून संपूर्ण जावळी तालुका दारू दुकानमुक्त आहे. एकही दारूचे दुकान नसलेला जिल्ह्यातील एकमेव व राज्यात दारूमुक्तीचा दिशादर्शक तालुका म्हणून जावळीची ओळख आहे. ही ओळख कायम राहण्यासाठी जावळीतील नागरिक जागरुक आहेत. नुकतेच शासनाने महामार्गाच्या ५०० मीटर परिसरात केलेल्या दारूदुकान बंदीमुळे दारू दुकानदार ग्रामपंचायत क्षेत्रात दुकाने सुरू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर या ग्रामसभेत गावात नवीन दारू दुकांनाना परवानगी देण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या संमतीने करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत.

Web Title: Gram Panchayats to be examined for the liquor viaduct!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.