विकासकामांसाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावेत : खाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:30+5:302021-02-11T04:41:30+5:30
सातारा : ‘अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तींचा विकास करणे या योजनेच्या १०० टक्के खर्चासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावेत,’ असे आवाहन ...
सातारा : ‘अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तींचा विकास करणे या योजनेच्या १०० टक्के खर्चासाठी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावेत,’ असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समिती सभापती कल्पना खाडे यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात सभापती कल्पना खाडे यांनी म्हटले आहे की, अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीचा विकास करणे या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी देण्यात येतो. या योजनेतून प्राधान्याने वस्तीमधील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पोहोच व अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, समाजमंदिर या कामास मंजुरी देण्यात येते. जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडून व ग्रामसभेने निश्चित केलेल्या कामांच्या प्राप्त आराखड्यानुसार २०१९-२० ते २०२२-२३ या वर्षासाठीच्या योजना आराखड्यास मंजुरी मिळालेली आहे.
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी १६ कोटी ७४ लाख २८ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही सभापती खाडे यांनी स्पष्ट केले.
..................................................