ग्रामपंचायतींनी स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:03+5:302021-05-13T04:39:03+5:30
उंब्रज : राज्य शासनाकडून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येणारा १५ टक्के मागासवर्गीय निधी हा कोरोना महामारीत अडकलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी ...
उंब्रज : राज्य शासनाकडून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येणारा १५ टक्के मागासवर्गीय निधी हा कोरोना महामारीत अडकलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी वापरण्यात यावा. या निधीतून तालुक्यातील मागासवर्गीय लोकांसाठी मोफत ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड असणारे हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी कराड तालुका आरपीआयच्या वतीने अभिषेक कांबळे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कराड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून, कित्येक लोक ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने जीव गमावत आहेत. शासनाने कोरोना महामारी संकटाच्या काळात कराड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला देण्यात येणाऱ्या मागासवर्गीय निधीतून मोफत उपचार मिळणारे २५ ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे हॉस्पिटल उभे करावे व सामान्य लोकांना कोरोनापासून वाचविण्याचा मार्ग निर्माण करावा. तरी प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी अन्यथा कराड तालुक्यातील सर्व मागासवर्गीय संघटना एकत्र येऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा अभिषेक कांबळे यांनी दिला आहे.