साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:40 AM2021-04-02T04:40:48+5:302021-04-02T04:40:48+5:30

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी ...

Gram Panchayats should take measures to prevent outbreak: Vinay Gowda | साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा

साथ उद्रेक होऊ नये यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना कराव्यात : विनय गौडा

Next

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जलजन्य आजारांचा उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा करताना टाकी स्वच्छता, पाणी शुद्धीकरण करून इतर उपाययोजनाही राबवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय गौडा यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात २०२१ मध्ये जलजन्य आजाराचे साथ उद्रेक झाले आहेत. याची माहिती घेतल्यावर असे लक्षात आले की, हे उद्रेक मुख्य जलवाहिनीला गळती, खासगी नळ कनेक्शन गळती, तुंबलेली गटारे आणि गटारातून जलवाहिनी जाणे तसेच टाकी व विहिरीची अस्वच्छता, पाण्याचे शुद्धीकरण न होणे यामुळे झालेले आहेत. मागील वर्षाची तुलना करता २०२१ मध्ये सुरुवातीपासूनच जलजन्य आजाराचे साथ उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढे अशी स्थिती राहिल्यास पुढील नऊ महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात साथ उद्रेक होण्याची भीती आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी उपाययोजना तत्काळ राबवाव्यात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यास मदत होईल.

ग्रामपंचायतीमार्फत दैनंदिन पाणीपुरवठा हा नियमित शुद्धीकरण करूनच व पुरेशा प्रमाणात करावा. पाणी उद्भव व पाण्याच्या टाक्यांच्या परिसरात ५० फुटांपर्यंत शौचालय, जनावराचा गोठा तसेच सांडपाण्याचा निचरा असता कामा नये. पाणी उद्भवाशेजारी पाणी साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच कपडे आणि जनावरे धुणे टाळणे गरजेचे आहे, नळयोजनेला कोठेही गळती असता कामा नये, याबाबत वारंवार पाहणी करावी, शुद्धीकरणनंतर अर्ध्या तासाने पाण्याचे वितरण करावे. शुद्धीकरणानंतर पाण्याची गुणवत्ता (ओटी टेस्ट) टाकीजवळ, प्रत्येक एंड पाईपच्या ठिकाणी असणाऱ्या शेवटच्या नळाची घेऊन त्याची नोंद ठेवावी. तीन महिने पुरेल एवढा टीसीएल साठा करून ठेवावा. तीन महिन्यांतून एकदा सार्वजनिक हातपंपाचे शुद्धीकरण करावे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे उद्भव याचे नमुने तीन महिन्यांतून एकदा तपासणीसाठी पाठवावेत, यासाठी ग्रामपंचायतींनी स्पीकरद्वारे लोकांत जागृती करावी, असेही स्पष्ट केले आहे.

Web Title: Gram Panchayats should take measures to prevent outbreak: Vinay Gowda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.