ग्रामसभेत उडाला दारूचा ‘बार’!
By Admin | Published: January 28, 2015 10:42 PM2015-01-28T22:42:54+5:302015-01-29T00:10:07+5:30
महत्त्वाच्या प्रश्नांना बगल : पाणीप्रश्न सोडून दारूधंद्यांच्या परवानगीवरून खडाजंगी
सातारा : गावोगावच्या ग्रामसभा पाणीप्रश्न सोडून दारूप्रश्नावर गाजत आहेत. गावातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर उपाय योजण्यासाठी खरं तर ग्रामसभेत निर्णय होणे अपेक्षित असताना दारू व्यवसायाला महत्त्व देण्यात आले. प्रजासत्ताकदिनी वाठार स्टेशन, देऊर, पाचवड, रेठरे, कार्वे येथे झालेल्या ग्रामसभांमध्ये गावाच्या हिताच्या दृष्टीने चर्चा होण्याऐवजी दारू दुकानांना परवानगी देण्यावरून खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. वाठार स्टेशनमध्ये तब्बल ३० दारूधंद्यानी ग्रामसभेने हिरवा कंदिल दाखविला तर रेठरे बुद्रुकमध्ये ‘बार’वरून सभा गुंडाळली. पाचवड येथे तर चक्क मंत्रालयातून परवानगी आणून ‘बार’ सुरू केला. पाण्याचा दुष्काळ, दारूचा सुकाळ, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कार्वेत दारूबंदीचा ‘बार’ फुसका
आगपाखड फुकाची : रेठऱ्यात आज होणार फैसला
कऱ्हाड/कार्वे : काही वर्षापूर्वी दारूबंदी झालेल्या गावात सध्या बाटली पुन्हा उभी असल्याचे दिसते. त्यातच आणखी काही गावे दारूबंदीसाठी सरसावत आहेत. ग्रामसभेत दारूबंदीसाठी वादळी चर्चाही होताना दिसते; पण दारूबंदी काही होत नाही. याचाच प्रत्यय सध्या कार्वे गावात येतोय. गावाच्या प्रवेशद्वारावर असलेला बिअर बार इतरत्र हलवावा, यासाठी काहीजण आक्रमक झालेत. बार हलविण्याबाबत संबंधितांनी २६ जानेवारीपर्यंतची डेडलाईनही दिली होती. मात्र, डेडलाईन उलटून गेली तरी परिस्थिती जैसे थे असल्याने दारूबंदीचा बार फुसका ठरल्याचे दिसते.
दरम्यान, रेठरे बुद्रुकमध्ये ग्रामसभेत नवीन बारला परवानगी देण्यावरून वादळी चर्चा झाली. चिठ्ठी टाकून मतदानही घेण्यात आले. मात्र, मतदानातून हाती आलेला निकाल धक्कादायक असल्याने याबाबत गुरूवारी विशेष सभा घेण्याचे ठरविण्यात आले आहे. गुरूवारी होणाऱ्या सभेत रेठऱ्यात बाटली ‘उभी’ की ‘आडवी’ याचा निर्णय होणार आहे.
कार्वे गावाच्या प्रवेशद्वारातच विदेशी बाटली उभी आहे. ही बाटली आडवी करण्यासाठी काही वर्षापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी याबाबत रणरागिणी चांगल्याच आक्रमक झाल्या. तंटामुक्तीचे अध्यक्ष मारूती जाधव यांनी संबंधित बिअर बारबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. बार इतरत्र हलवावा, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. तसेच याबाबत निर्णय न झाल्यास २६ जानेवारीला साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपोषणास सुरूवात करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
ग्रामसभेत नेहमीप्रमाणे बार इतरत्र हलविण्याच्या मागणीचा फक्त ठराव झाला. मोर्चा, उपोषणाचा इशारा देणाऱ्यांनाच त्याचा विसर पडल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
दोनशे लोकांमागे एक दारूचे दुकान
सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या वाठार स्टेशनमध्ये आता एकूण ३४ दारूची दुकाने सुरू झाली आहेत. म्हणजेच सुमारे दोनशे लोकांमागे एक दारूचे दुकान असे चित्र निर्माण झाले आहे.
जुन्यांना शह देण्यासाठी...
दारू व्यावसायिक हे गावातील राजकारणी मंडळी असल्याने त्यांना शह देण्यासाठी नव्या दुकानांना एकमुखी परवानगी देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
जुन्यांना शह देण्यासाठी...
दारू व्यावसायिक हे गावातील राजकारणी मंडळी असल्याने त्यांना शह देण्यासाठी नव्या दुकानांना एकमुखी परवानगी देण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
गावात दोन दारू दुकानाच्या मागणीचे अर्ज मासिक सभेत आले होते. मात्र, प्रस्थापित दारू व्यावसायिकांनी या दोघांना परवानगी मिळू नये, यासाठी गावातील २५ जणांना अर्ज करायला लावले. ग्रामसभेत या सर्वांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे विरोधकांची चाल त्यांच्यावरच उलटली आहे.
- अमोल आवळे, सरपंच, वाठार स्टेशन
पाण्याचा दुष्काळ, दारूचा सुकाळ
वाठार स्टेशनमध्ये तीस दारू व्यावसायिकांना हिरवा कंदील
वाठार स्टेशन : पाण्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन गावात यापुढे पाण्याचा दुष्काळ जरी कायम राहिला तरी दारूचा मात्र सुकाळ येणार आहे. गावोगावी दारूबंदी होत असताना प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेत तीस नवीन दारूधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे.
सुमारे आठ हजार लोकसंख्येच्या या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. मात्र, २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत दारूधंद्यांना परवानगी मागणाऱ्या तब्बल ३० जणांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे पूर्वी अधिकृत असलेल्या दोन बिअर शॉपी व दोन देशी दारूच्या दुकानांत आता नव्याने आणखी ३० दुकानांची भर पडली असून आता ३४ दारूची दुकाने सुरू होणार आहेत. (वार्ताहर)
गावागावात दारूबंदीचा डंका
राज्यात प्रथमच कऱ्हाड तालुक्यातील ओंड गावात आवाजी मतदानाद्वारे उभी बाटली आडवी झाली. रणरागिणींच्या लढ्याला त्यावेळी यश आले. ओंडपाठोपाठ तालुक्यातील तांबवे गावातही आवाजी मतदानाने दारूबंदी करण्यात आली. त्यानंतर इतर गावातील महिलाही दारूबंदीसाठी सरसावल्या. अनेक गावांमध्ये बाटली ‘आडवी’ झाली. काही ठिकाणी देशी दारूची दुकाने व बारवर महिलांनी मोर्चा चढविला. तोडफोड करीत त्यांनी दारू दुकान व बारला टाळे ठोकले.
गावात पाच वर्षांपूर्वी महिला ग्रामसभा होऊन दारूबंदीचा ठराव दिला असताना त्यांना विचारात न घेता हा ठराव मान्यच कसा झाला? समाजविघातक गोष्टींबाबत ठरावांनाच प्राधान्य दिले जात असेल तर याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
रूपाली जाधव, सभापती, कोरेगाव