ग्रामसेवकांनी बांधला वनराई बंधारा
By admin | Published: December 17, 2014 09:31 PM2014-12-17T21:31:50+5:302014-12-17T23:03:18+5:30
पाण्याचा प्रश्न मार्गी : विभागात अन्य पाच ठिकाणी साकारले बंधारे
तळमावले : काळगाव आणि कुंंभारगाव ग्रामसेवकांनी हातात खोरे आणि टिकाव घेऊन एका दिवसात सुमारे तीनशे सिमेंट पोत्यांचा श्रमदानातून वनराई बंधारा बांधला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यात यावेत, अशी सूचना सातारा येथे झालेल्या बैठकीत केली होती़ त्यानुसार पाटणचे गटविकास अधिकारी अरविंद पाटील यांनी हालचाली सुरू केल्या व काळगाव आणि कुंभारगाव विभागातील ग्रामसेवकांना याची कल्पना दिली़ या कल्पनेला ग्रामसेवकांनी तत्काळ होकार देऊन बंधारा बांधण्याचे नियोजन केले आणि चिखलेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात माटेकर जवळील ओढ्यावर बंधारा बांधण्याचे ठरविले.
त्यानुसार विभागातील सर्व ग्रामसेवक, ग्रामसेविका यांनी एकत्र येऊन ओढ्यातील वाळू, दगड एकत्र करून सुमारे तीनशे पोती भरली व एकावर एक रचून पाच तासांमध्ये वनराई बंधारा बांधला़ एवढेच नव्हे तर या बंधाऱ्यातून पाणी गळती होऊ नये, यासाठी उपाययोजनाही आखल्या़
विभागातील ग्रामसेवकांनी श्रमदानातून बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे या ठिकाणी पाणीसाठा झाला आह़े़ त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे़ (वार्ताहर)