पुरोगामी विचार वाचविण्यासाठी महाआघाडी सरकार एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:12+5:302021-02-23T04:58:12+5:30
कऱ्हाड : प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय असा आरोग्य विभागाचा मूलभूत पाया रचण्याची अभूतपूर्व कामगिरी केंद्रातील युपीए काँग्रेस ...
कऱ्हाड : प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय असा आरोग्य विभागाचा मूलभूत पाया रचण्याची अभूतपूर्व कामगिरी केंद्रातील युपीए काँग्रेस सरकारने केली होती. देशातील आरोग्याची मूलभूत सुविधा भक्कम असल्याने आपण कोरोनाच्या महामारीला यशस्वीपणे तोंड दिले, असे सांगून कोरोनानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारने खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ यशस्वीरित्या घातला आहे. त्याचबरोबर पुरोगामी विचार वाचविण्यासाठी महाआघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत, असे मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पोतले (ता. कऱ्हाड) येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितराव पाटील, मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगलताई गलांडे, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता थोरात, डॉ. हर्षाली जगताप, कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील, पोतलेच्या सरपंच वैशाली माळी उपस्थित होत्या.
आमदार चव्हाण म्हणाले, पोतलेच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. विकासाची भूक थांबवू नका. तुम्ही विकासकामे आणखी मागा, मी ती देत राहीन. गाव आणि गावाचा विकास हे उद्दिष्ट पोतलेकरांनी ठेवल्याने हे अभिनंदनीय आहे. येथील आरोग्य उपकेंद्राचे देखणे व सुबक काम झाले आहे. त्याची सर्वांनी मनोभावे जपणूक करावी.
उदयसिंह पाटील म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद दुसऱ्यांकडे गहाण ठेवल्यास विरोधक आपल्याला देशोधडीला लावतील. त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थासाठी कुणाबरोबर न जाता काँग्रेसचा विचार आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्यांबरोबर राहा.
माजी सरपंच रामचंद्र पाटील, दिलीप शिंदे, नीलेश पाटील, मानसिंग पाटील, लता पाटील, सुनील पाटील, धनाजी शिंदे, विजय पाटील, अनिल माळी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
फोटो ओळ
पोतले (ता. कऱ्हाड) येथे उभारलेल्या आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी उदयसिंह पाटील, डॉ. संगीता देशमुख, डॉ. आबासाहेब पवार, आदी उपस्थित होते.
फोटो 22 pramod 05